नवी दिल्ली – बिहारच्या निवडणूकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या आतापर्यंतच्या विजयामध्ये महिलांचा वाटा अधिक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच कॉंग्रेसने बिहारमधील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिला क्रांती संमेलन आयोजित करण्याचे ठरवले आहे.
या महिलांच्या संमेलनाला कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा या आभासी प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कॉंग्रेसचे हे महिला संमेलन होण्याची शक्यता आहे.
खूप मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जाणाऱ्या या महिला संमेलनासाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वढेरा यांनी वेळ द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
हे संमेलन खूप मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जाणार असल्याने बिहारमधील सर्वच चित्रपटगृह आणि सभागृहांचे आरक्षण कॉंग्रेसच्यावतीने केले जात आहे. या ठिकाणी मोठ्या पडद्यावर प्रियांका गांधी यांचा व्हिडीओ संदेश या महिलांसमोर प्रदर्शित केला जाणार आहे.