चीनमध्येही करोना प्रतिबंधक लसीकरणाची तयारी सुरु

नवी दिल्ली : करोनाचा जिथे उदय झाला तिथे म्हणजेच चीनमध्ये आता करोना प्रतिबंधक लसीकरणाची तयारी सुरू झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात चीनमधील वेगवेगळ्या राज्यांनी प्रायोगिक, देशी बनावटीच्या लसींची मागणी नोंदवली आहे. परंतु, आरोग्य अधिकाऱ्यांनी १.४ अब्ज लोकांना लस कशी पुरवणार हे स्पष्ट केलेले नाही.

लस विकसक कंपन्या अंतिम चाचण्या करण्यात गुंतल्या असून चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या एका बैठकीत याविषयी माहिती दिली आहे. अंतिम चाचण्या वेगात सुरू आहेत. दरम्यान, ब्रिटनने फायझर इनकार्पोरेशनच्या लशीला मान्यता दिली आहे. चीनमध्ये सध्या पाच लशींवर काम सुरू असून चार उत्पादक कंपन्या चाचण्या करीत आहेत. रशिया, इजिप्त व मेक्सिकोत चिनी लशींच्या चाचण्या सुरू आहेत.

आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जर या चाचण्या यशस्वी झाल्या, तर अमेरिका, युरोप व जपान तसेच इतर विकसित देशात या लशींनाआपत्कालीन परवानगी मिळण्याची शक्यता आहे. विकसनशील देशांना परवडतील अशा दरात आम्ही लशी देऊ,असे चीनकडून सांगण्यात आले आहे.

सिनोफार्म या कंपनीने म्हटले आहे, की नोव्हेंबरमध्ये त्यांनी चीनमध्ये लस वापराचा परवाना मिळण्याकरिता अर्ज केला होता. इतर काही कंपन्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी आपत्कालीन परवाना देण्यात आला होता. बीजिंगमधील सिनोफार्म व सिनोव्हॅक कंपन्यांना भेट देऊन उपपंतप्रधान सन चुनलान यांनी पाहणी केली. किती लोकांना लस देणार हे अजून चीनने स्पष्ट केलेले नाही. चीनमध्ये आतापर्यंत १० लाख लोकांना प्रायोगिक लस दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.