टीव्हीवरील लोकप्रिय रियॅलिटी शो “बिग बॉस’च्या 14व्या सीझनची तयारी सुरू झाली आहे. वास्तविक, टीव्ही मालिकांच्या शूटिंगची घोषणा झाल्यापासून निर्मात्यांनी शोची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, सलमान आपल्या पनवेल फार्महाऊसवर “बिग बॉस 14’चा प्रोमो शूट करणार आहे.
लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सलमान सतत “बिग बॉस’च्या निर्मात्यांशी विविध संकल्पनांबद्दल चर्चा करत आहे. तसेच करोनाचा धोका कायम राहिल्यास शोमध्ये कोणत्या प्रकारची खबरदारी घेतली जावी याचाही विचार करण्यात येत आहे. परंतु संसर्गाचा धोका लक्षात घेता हा शो काही महिन्यांसाठी पुढे ढकलला जाऊ शकतो. दरम्यान, “बिग बॉस’ शोमध्ये 300हून अधिक क्रू मेंबर्स दिवस-रात्र काम करतात.
यात कॅमेरापर्सनपासून टेक्नशियंस्चा समावेश आहे. या कार्यक्रमाशी संबंधित एका सूत्राचे म्हणणे आहे की, “बिग बॉस 14’ची घोषणा जूनमध्येच होणार होती. पण आता अमिताभ बच्चनदेखील घरातून “कौन बनेगा करोडपती’चे शूटिंग करत आहे. सलमाननेही पनवेल फार्महाऊसमधून असेच काहीतरी करण्याची शक्यता आहे.