पॅरिस – फ्रान्समध्ये करोनाच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अचानक वाढल्यामुळे तेथे नव्याने लॉकडाऊन लावायला लागणार आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर हळूहळू सर्व जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने आता महिन्याभरासाठी या सार्वजनिक जीवनाला ब्रेक लागण्याच्या शक्यतेमुळे उद्योग विश्वामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मात्र करोनाचा संसर्ग या लॉकडाऊनमुळेच आटोक्यात येऊ शकणार असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात दिलासा मिळाल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
या लॉकडाऊनमुळे करोनाच्या संसर्गामुळे होत असलेले मृत्यू रोखले जाणार असतील, तर आपले शॉपिंगचे स्वातंत्र्य काही काळासाठी सोडून द्यायची तयारी पॅरिसमधील शेतीविषयक बाजारामध्ये खरेदीला येणाऱ्यांनी व्यक्त केली अहे.
हा नवीन लॉकडाऊन पूर्वीच्या लॉकडाऊनसारखा कडक असणार नाही. मात्र यामूळे रेस्टॉरंट आणि अन्य आवश्यक उद्योग बंद ठेवावे लागणार आहेत. यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेला पुन्हा ब्रेक लागणार आहे.
शिक्षणात खंड पडू नये म्हणून आणि पालकांना त्यांचे उद्योग करण्याची परवानगी मिळावी यासाठी शाळा यावेळी खुल्या राहतील. शेतकरी बाजारपेठा, उद्याने आणि कारखानेही चालू ठेवले जाऊ शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी प्रस्तावित केलेल्या या लॉकडाऊनबाबतचा अधिकृत निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.
या प्रस्तावावर संसदेमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू असून जर अनुकूल मतदान झाले, तर हा लॉकडाऊन लगेच मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.