मुंबई – अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीला दिल्ली विधानसभेमध्ये मोठे यश मिळाल्यामुळे आता “आप’चा विस्तार अन्य राज्यांमध्ये करण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात “आप’चा पाया मजबूत करणार असल्याचे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रीती मेनन यांनी यांनी बुधवारी सांगितले. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणूका “आप’ लढवणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्येही सक्रिय होणार असल्याचे मेनन यांनी सांगितले.
दिल्लीतील प्रशासनाचे मॉडेल महाराष्ट्रातही लागू करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. महाराष्ट्रातील लोकांना प्रशासनाचे असेच मॉडेल अपेक्षित आहे. सर्व निवडणूका लढवायचा आमचा प्रयत्न असेल. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सहभागी होण्याचाही “आप’चा प्रयत्न असेल, असेही मेनन म्हणाल्या.