पुणे – आगामी कॅन्टोन्मेंट निवडणुकांच्या पूर्वतयारीचे आदेश संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. यासाठी प्रत्येक कॅन्टोन्मेंट बोर्डाने त्यांच्या प्रभागातील आरक्षणाची प्रक्रिया करण्याची सूचनादेखील देण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच पुणे, खडकी आणि देहरोड कॅन्टोन्मेंटमध्ये प्रभाग आरक्षित केले जाणार आहे. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये कोणता प्रभाग कोणासाठी आरक्षित केला जाणार आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
देशभरातील 62 पैकी 56 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी 2020 रोजी पूर्ण होत आहे, तर चार बोर्डांचा कार्यकाळ जून-जुलै 2020 रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका जाहीर करण्यासाठी फारच थोडा कालावधी उरला आहे. त्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डांना निवडणुका घेण्यासाठी, तसेच वॉर्ड आरक्षणासाठीच्या प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार, संरक्षण मालमत्ता विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डांना पत्र पाठवून कॅन्टोन्मेंट निवडणुका नियमावलीत नमूद प्रक्रियेनुसार आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये 2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी वॉर्ड आरक्षित करावा, तसेच सार्वजनिक नोटीस जारी करून आणि चिठ्ठ्या पाडून महिलांसाठी वॉर्ड आरक्षित करावा. हे प्रस्ताव संरक्षण मालमत्ता विभागाकडे पाठविल्यावर त्यांची छाननी करून, अधिसूचना जारी केली जाणार आहे. केंद्र सरकारतर्फे निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. पुणे, खडकी आणि देहरोड कॅन्टोन्मेंटमध्ये फेब्रुवारी 2020 मध्ये निवडणुका होणार असून, त्यासाठी लवकरच प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया केली जाणार आहे.
पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये तीन प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित असणार असून एक प्रभाग हा अनुसूचित जाती, जमातीसाठी राखीव ठेवला जाणार आहे. त्यामुळे नेमका कोणता प्रभाग कोणासाठी आरक्षित केला जाईल, याबाबत लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.