पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असून, पुण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस-शरदचंद्र पवार या पक्षाला आठपैकी तीन ते चार जागा मिळण्याची शक्यता आहे. तरीही, पक्षाकडून शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती बुधवारी घेण्यात आल्या.
पक्षाकडून या जागांसाठी मागील महिन्यात अर्ज मागविण्यात आले होते. त्यात ४१ अर्ज आले, तरी बुधवारी प्रत्यक्षात ४६ जणांनी मुलाखती दिल्या.
पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, माजी खासदार अॅड. वंदना चव्हाण, फौजिया खान, जयदेव गायकवाड, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात प्राथमिक चर्चेत राष्ट्रवादीला हडपसर, वडगावशेरी, खडकवासला तसेच पर्वती या जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी शिवसेनेकडून पर्वती आणि हडपसरची मागणी केली जात आहे.
तसेच काॅंग्रेसकडूनही या दोन्ही जागा पक्षाला मिळाव्यात, असा आग्रह स्थानिक नेत्यांसह शहर काॅंग्रेसने केली आहे. तर शिवसेना नेत्यांकडून हडपसरसाठी थेट उमेदवाराचे नावच जाहीर करण्यात आले. तर, पर्वतीची जागाही काॅंग्रेसला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे या दोन्ही ठिकाणी इच्छुकांकडून “या मतदारसंघांमध्ये पक्षाची ताकद आहे. या जागा आपल्याकडेच राहाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. या जागा इतर पक्षाला दिल्यास आपल्याकडे उमेदवार नाहीत का? असा असाही प्रश्न उपस्थित होवू शकतो,’ त्यामुळे या जागा पक्षाकडेच ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.