खंडा स्पर्धा : खांदेकरी, मानकरी यांचे सन्मान
जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचा मर्दानी मऱ्हाठमोळा दसरा उत्सव मंगळवारी (दि. 8) साजरा होत असून, सुमारे 16 ते 18 तास रंगणाऱ्या या उत्सवाची सांगता बुधवारी (दि. 9) दुपारी 12 वाजता होणार आहे.
जेजुरीनगरीतील अठरापगड जाती-धर्मातील समाजबांधव, ग्रामस्थ, मानकरी, पुजारी, खांदेकरी, सेवेकरी, देवसंस्थान विश्वस्त, अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने खंडेरायाच्या दसरा उत्सवाची तयारी करण्यात आली आहे. देवसंस्थानच्या वतीने मुख्य मंदिरांसह गडकोट, आवार, बालद्वारी येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नगरप्रदक्षिणा, रमणामार्ग, देवभेट पालखी कट्टे व मार्गाची साफसफाई, दुरुस्ती करण्यात आली आहे. गडकोट आवारातील बालद्वारीमध्ये घटस्थापनेपासून लोककलावांची हजेरी, घडशी समाजबांधवांकडून त्रिकाल सनईचौघडा वादन करण्यात येत आहे.
मुख्य दसरा उत्सवाच्या दिवशी सालाबादप्रमाणे प्रमुख वतनदार, इनामदार पेशवे यांच्या आदेशानुसार खांदेकरी, ग्रामस्थ, मानकरी यांच्या साथीने मुख्य गडकोट आवारातून देवभेट सोहळ्यासाठी भंडाऱ्याच्या उधळणीत पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. मध्यरात्रीच्या सुमारास जयाद्री डोंगररांगेच्या कुशीत फटाक्यांच्या आतषबाजीत दोन्ही पालख्यांचा देवभेट सोहळा रंगणार असून, नगरप्रदक्षिणा उरकून पालखी सोहळा बुधवारी सकाळी गडावर दाखल झाल्यानंतर ऐतिहासिक खंडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यामध्ये यंदा चित्तथरारक खंडा कसरती होणार असून, मोठ्या रक्कमेची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
देवसंस्थानकडून या वर्षांपासून खंडेरायाचे मानकरी, ग्रामस्थांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे तर लोककलावंतांना मानधन, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.