कंगणा रणावत नेहमीच आपल्या रोलसाठी जरा जास्तच मेहनत घेत असते. आता “पंगा’मधील कबड्डी खेळाडूचा रोल साकारण्यासाठीही ती अशीच जोमाने मेहनत करते आहे. सिनेमाच्या दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांनी या सिनेमाच्या पडद्यामागच्या काही क्षणचित्रांना ट्विटरवर पोस्ट केले आहे. त्यात कंगणा आपल्या सहकलाकारांबरोबर मैदानात कबड्डी खेळताना दिसते आहे. खेळून खेळून ती घामाघूम झाली आहे.
एखाद्या कसलेल्या कबड्डीपटूप्रमाणे कंगणा “एन्ट्री’ घेते. प्रतिस्पर्धी खेळाडूला झटकन स्पर्श करते आणि सीमा रेषा ओलांडून सुखरूप माघारीही येते, असे या छोट्या व्हिडीओमध्ये दिसते आहे. पडद्यावर कबड्डी खेळताना चुका होऊ नयेत म्हणून कंगणासह बहुतेक अन्य कलाकारांनी तब्बल दोन महिने कबड्डीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. “पंगा’मध्ये कंगणाबरोबर पंजाबी गायिका जस्सी गिल, नीना गुप्ता आणि रिचा चढ्ढाही असणार आहेत. “पंगा’चे दिल्लीतले शुटिंग एप्रिलमध्येच संपले आहे. आता “पंगा’ची टीम कोलकात्यातील शुटिंगसाठी रवाना झाली आहे. पुढच्या वर्षी 24 जानेवारीला “पंगा’ रिलीज होणार आहे. “मणिकर्णिका’च्या यशानंतर कंगणाचा “मेंटल है क्या’ 26 जुलैला रिलीज होतो आहे.