जम्बो हॉस्पिटलबाबत आयुक्तांची माहिती
पुणे – ‘सीओईपी’तील जम्बो कोविड हॉस्पिटलमधील नियोजित डॉक्टर्स आणि नर्सेसच्या नियुक्तीचा प्लॅन तयार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरुवारी सांगितले. ज्या “मेटाब्रो’ कंपनीला येथील व्यवस्थापनाचे काम दिले आहे, त्यांनी ही लिस्ट महापालिकेला दिली आहे.
जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला डॉक्टर्स, नर्सेस नाहीत. अन्य वैद्यकीय सहाय्यक मनुष्यबळ नाही, अशी ओरड होऊन याविषयी नकारात्मकता तयार झाली होती. मात्र, आता या जम्बो हॉस्पिटलला बळ देऊन त्याची पुन:श्च उभारणी करण्यात आली आहे. ज्या कंपनीला हे काम देण्यात आले होते, त्यांना काढून टाकून “मेटाब्रो’ कंपनीला हे काम दिले.
या कंपनीने व्यवस्थापनाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर 400 बेडचे नियोजन सद्यस्थितीत झाले आहे. आणखी 400 बेडचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी तेथे डॉक्टर्स, नर्सेस तसेच अन्य तज्ज्ञ वैद्यकीय स्टाफची आवश्यकता आहे. हा स्टाफ कधी जॉईन होणार याचा सगळा डाटा संबंधित कंपनीने हॉस्पिटलच्या पीएमआरडीए आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नेमलेल्या कार्यकारी समितीकडे सोपवल्याचे आयुक्त कुमार यांनी सांगितले.
ऑक्सिजन बेड रिकामे…
शहरातील रुग्णालयांतील ऑक्सिजन बेड रिकामे राहात आहेत, ही एकप्रकारे आनंदाचीच बाब म्हणावी लागेल. जम्बोसह महापालिकेच्या रुग्णालयातील 180 आणि खासगीमधील सुमारे 120 बेड असे सुमारे 300 ऑक्सिजन बेड आज रिकामे होते. सध्या, केवळ व्हेंटिलेटर बेडचीच कमतरता आहे. ते कमी शिल्लक राहात आहेत, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नमूद केले.