बारामतीत मतदान प्रक्रियेसाठी जय्यत तयारी

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती

बारामती- विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील यांनी दिली. बारामती विधानसभा मतदारसंघात आठ ठिकाणच्या मतदान केंद्रात किरकोळ बदल करण्यात आला आहे. त्याची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे.

बारामतीत 37 मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचे वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. कोणीही या मतदान केंद्रावरील प्रक्रिया इंटरनेटच्या माध्यमातून पाहू शकतात. यात 17 संवेदनशील मतदान केंद्राचाही समावेश करण्यात आला आहे. पोलिसांकडूनही ज्या संवेदनशील मतदान केंद्राची यादी तयार करण्यात आली आहे. त्याचाही यात समावेश असल्याचे कांबळे यांनी सांगितले. दरम्यान, कटफळ येथील एका मतदान केंद्राचे कामकाज पूर्णपणे महिला सांभाळणार आहेत. मतदान सकाळी सात वाजता सुरू होणार असले तरी दीड तास अगोदर म्हणजे साडेपाच वाजता मॉक पोल घेतले जाईल. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसाठी 15 मिनिटे वाट पाहून नंतर ही प्रक्रिया पार पाडली जाईल.

  • 220 व्हिल चेअरचीही सुविधा
    बारामती मतदारसंघात 220 मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी व्हिल चेअर ठेवण्यात येणार आहे. 141 ठिकाणी मतदारांच्या सोयीसाठी भिंगही ठेवले जाणार आहे. ज्यांना दृष्टीदोष आहे, अशांना भिंग पुरविले जाईल. मतदानाची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या जोडीला पोलीस विभागानेही जय्यत तयारी केली आहे. निर्भय व मुक्‍त वातावरणात मतदान पार पाडण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक निरीक्षकांचेही या प्रक्रियेवर दैनंदिन लक्ष असून त्यांच्या सूचनांनुसार आमचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.