रेडा- शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या 2019-20च्या ऊस गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली असून शनिवारी (दि.23) कारखान्याचे संस्थापक व राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गळीताचा शुभारंभ होणार आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी सांगितले.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने यापूर्वीचे 18 गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. मागील 2018-19 या गळीत हंगामात कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 2601 रूपये दर दिलेला आहे. सदरचा दर हा एफआरपी पेक्षा प्रतिटन रु.128 अधिकचा आहे. आगामी 2019-20च्या 19व्या ऊस गळीत हंगामासाठी ऊस तोडणी वाहतूकदार, कंत्राटदार यांची बैलगाड्या, बजाट, ट्रॅक्टर, ट्रक आदी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती अध्यक्ष पवार यांनी दिली. यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, उदयसिंह पाटील व कार्यकारी संचालक धीरजकुमार माने उपस्थित होते.