पुणे स्टेशन येथून प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात
पुणे – अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या प्रीपेड रिक्षा अखेरीस पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. गुरुवारपासून या सेवेला मुहूर्त मिळाला आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये पुणे स्टेशन येथून प्रीपेड रिक्षा धावणार आहेत. यासह पुढील आठवडाभरामध्ये स्वारगेट, संगमवाडी आणि शिवाजीनगर स्थानकांवर सेवा सुरू करण्यात येणार आहे.
शहरामध्ये अनेक दिवसांपासून प्रीपेड रिक्षाचा प्रस्ताव प्रलंबित होता. त्याला नुकतीच प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) देखील मान्यता दिली. यामुळे प्रीपेड रिक्षा धावण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, सेवा देण्यासाठी लागणारे ऍप, रिक्षाचालकांचा प्रत्यक्ष सहभाग, ऍपवरील नियंत्रण आदींबाबत चर्चा करून या योजनेला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांच्या रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा संस्थेच्या नियंत्रणाखाली ही सेवा देण्यात येणार आहे.
मागील अनेक महिन्यांपासून आरटीओ, वाहतूक पोलीस आणि रिक्षा संघटनांमध्ये चर्चा सुरू होती. पुणे स्टेशन येथे प्रायोगिक तत्त्वावर रिक्षा सेवेला सुरुवात होणार आहे. प्रीपेड रिक्षा सेवा ही ऍपवर आधारित आहे. यामध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू आहे.
शहरात गुरुवारपासून सेवेला सुरुवात होणार आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये दिवसा सेवा देण्यात येणार आहे. तर काही दिवसांनंतर 24 तास प्रीपेड रिक्षा उपलब्ध करून देण्यात येईल.
– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा