“महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त”; राजीव सातव यांच्या निधनानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया

मुंबई : राजीव सातव यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राजीव सातव यांचे रविवारी कोरोनामुळे निधन झाले. गेल्या 24 दिवसांपासून राजीव सातव कोरोनाशी झुंज देत होते. त्यांनी कोरोनावर मातही केली होती. मात्र, त्यानंतर सायटोमॅजिलो या विषाणूची लागण झाल्याने त्यांची प्रकृती पुन्हा गंभीर झाली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

शरद पवार यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राजीव सातव यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे. त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.