पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) पूर्व परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेतून 760 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहे. या पूर्व परीक्षेचा कटऑफ 64 गुणांचा होता.
आयोगातर्फे दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग संवर्गातील 74 पदासाठी 1 मार्च 2020 रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. या परीक्षेतून एकूण 760 उमेदवार मुख्य परीक्षा देणार आहेत. मुख्य परीक्षेसाठी मुदतीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेस प्रवेश दिला जाणार आहे. अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांना आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील माहितीच मुख्य परीक्षेसाठी स्वीाकारार्ह आहेत. उमेदवारांने मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आश्यक आहे. त्यासाठी परीक्षा केंद्र निश्चित करावे लागेल. त्यानंतर शुल्क भरणे आवश्यक आहे. त्याशिवाय मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नसल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.