लखनौ – गाझियाबादच्या साहिबाबादमध्ये एका गर्भवती महिलेची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. तारेच्या सहाय्याने महिलेचा गळा आवळून खून करून अज्ञात चोरट्यांनी दरोडा घातला. तत्पूर्वी घरात उपस्थित असलेल्या एका वृद्ध महिलेला बाल्कनीत कोंडून ठेवले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
गाझियाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिबाबाद डीएलएफ परिसरातील एका घरात बाथरूममध्ये महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाली. गरोदर महिलेचा वायरने गळा आवळून खून करण्यात आला आहे. डीएलएफ कॉलनीतील आशीर्वाद अपार्टमेंट बिल्डिंगमधील घर क्रमांक 17 ब्लॉक ए-37 मध्ये राहणारे संतोष कुमार शुक्रवारी त्यांच्या कार्यालयात गेले होते. त्यांची 20 वर्षीय पत्नी संतोषी उर्फ सोनू आणि वृद्ध आई घरी होते.
संतोष रात्री घरी पोहोचले असता घरातील वीज बंद असल्याचे दिसले. त्यानंतर आई बाल्कनीत बंद असल्याचे आणि पत्नीचा मृतदेह घराच्या बाथरूममध्ये पडून असल्याचे आढळून आले. घरातील वस्तू विखुरलेल्या होत्या. संतोषच्या म्हणण्यानुसार, त्याची पत्नी एक महिन्याची गर्भवती होती. वरील फ्लॅटमध्ये राहणारे मजूर व त्याचा ठेकेदार विपीन यांच्यावर खून व दरोड्याचा संशय मृतकाच्या पतीने संतोषने व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. एसएसपीच्या म्हणण्यानुसार, संध्याकाळी कामावरून घरी परतलेल्या महिलेच्या पतीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. महिलेचा मृतदेह बाथरूममध्ये पडलेल्या अवस्थेत आढळून आला असून घराचे कपाट व लॉकर तुटलेले आढळून आले. प्राथमिक तपासात दरोड्यादरम्यान खून झाल्याचा संशय आहे. या घटनेचा तपास आणि खुलासा करण्यासाठी एसपी सिटी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस अनेक बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.