पिंपरी – पाणी तापवण्याच्या वॉटर हीटरचा शॉक लागून तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. ही ह्रदयद्रावक घटना सोमवारी (दि. 26) सकाळी पिंपळे निलख येथे घडली.
मुस्कान सलमान बागवान (वय 21, रा. विशालनगर, पिंपळे निलख) असे मृत्यूमुखी पडलेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुस्कान या आंघोळीसाठी सकाळी नेहमीप्रमाणे बाथरूममध्ये गेल्या.
पाणी तापविण्याचा वॉटर हिटर पाण्याने भरलेल्या स्टीलच्या बादलीमध्ये टाकला. त्यावेळी अचानक त्यांचा हात बदलीला हात लागला. यामुळे त्यांना विजेचा जोरदार झटका बसला. जखमी मुस्कान यांना त्वरीत रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत. मुस्कान यांना दीड वर्षाचा एका लहान मुलगा आहे. मुस्कानच्या मृत्युमुळे आई- वडिलांना देखील मोठा मानसिक धक्का बसला आहे.