विपीन गांधी ः इंदापूर येथील श्री 1008 शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात बैठक
इंदापूर – पुणे हे विद्येचे माहेरघर असून शहरात दिगंबर जैन संस्कृती अंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाचे हुमड केंद्र स्थापन करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याची माहिती फेडरेशन ऑफ हुमड समाज आंतरराष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विपीन गांधी यांनी दिली.
फेडरेशन ऑफ हूमड जैन समाज हूमड संपर्क अभियान अंतर्गत दौंड, निरा, को-हाळे, वडगांव निंबाळकर, पणदरे, माळेगांव, बारामती, वालचंदनगर, निमगाव केतकी, लासुर्णे नंतर इंदापूर येथील श्री 1008 शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरमध्ये आयोजीत बैठकीत ते बोलत होते. विपीन गांधी पुढे म्हणाले, हुमड जैन समाजासाठी फेडरेशन कोणते प्रकल्प राबवत आहे,
खेडेगावातील मंदीर, समाजासाठी फेडरेशन कशी मदत करणार, पुणे शहरामधे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हुमडकेंद्र स्थापन करून तेथे त्यागी निवास, त्यागी आहार व्यवस्था, मुला मूलींसाठी वसतिगृह, मंदीर, हूमड वृद्ध व्यक्तीं साठी औषधोपचार केंद्र, दिगंबर जैन शिक्षा संस्कार केंद्र, भव्य, अत्याधुनीक सांस्कृतीक केंद्र, प्रशस्त पार्किंग, हेलीपॅड, रिसॉर्ट, 50 रुमचे सॅनिटोरीम, जैन वृद्ध आरोग्य वृद्धाश्रम आदी प्रकल्प लोक सहभागातून राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
राष्ट्रीय महामंत्री महेश बंडी म्हणाले, प्राचीन भारतीय संस्कृतीतील श्रमण संस्कृतीचे दिगंबर जैन समाज प्रतीक असून यामध्ये हुमड समाज महत्वपूर्ण आहे. संपूर्ण जैन समाजाची लोकसंख्या 40 लाखा च्या आसपास असून त्यामध्ये केवळ 1 लाख 20 हजार हुमड समाज आहे. त्यामुळे समाजा च्या सर्वांगीण विकासा साठी कटिबद्ध आहे.
फेडरेशन ऑफ हूमड जैन समाज संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा म्हणाले, हुमड जैन समाज संघटन ही काळाची गरज आहे. या फेडरेशनला किशोर शहा, चकोर गांधी, सुरेंद्र गांधी, मिहिर गांधी, सुशील शहा, डॉ. दिलीप कियावत, दिलीप बंडी, राजेश बोवडा, राष्ट्रीय महिला संघटन महामंत्री सुजाता शहा, महाराष्ट्र अध्यक्ष किरणकुमार शहा, महामंत्री डॉ. रविकिरण शहा, श्रीमती तनुजा शहा, संज्योत व्होरा, आदींचे सहकार्य लाभले आहे. युगल मुनिराज श्री 108 अमोघकिर्ती महाराज व अमरकिर्ती महाराज यांचे आशीर्वाद लाभले आहेत.
फेडरेशनचे आजीव सदस्य झाल्याबद्दल यावेळी संगीता श्रेणिक शहा, सुश्रुत शहा व दर्शन शहा यांचा अध्यक्ष विपीन गांधी व महामंत्री महेंद्र बंडी, किरणकुमार शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जैन श्रावक, श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.