पिंपरी – दिवाळी ही आनंदोत्सव घेऊन येते. या सणानिमित्त मित्र परिवार, स्नेही, नातेवाईक यांना मिठाईची देवाणघेवाण होते. कंपन्यांकडून कामगारांना मिठाई दिली जाते. त्यासाठी मिठाई विक्रेत्यांनी मिठाई, सुकामेवा, नमकीन यांचे आकर्षक पॅकींग तयार केले आहेत. या पॅकींगमधील मिठाईला हळूहळू मागणी वाढू लागली आहे.
दिवाळीमध्ये घरोघरी फराळाचे पदार्थ तयार केले जातात. त्याचप्रमाणे, विविध प्रकारची मिठाई आणुन त्याचा आस्वाद घेतला जातो. सध्या राज्यभरात अनलॉकची प्रक्रिया चालू आहे. बाजारपेठांमध्ये दिवाळीचा उत्साह पाहण्यास मिळत आहे.
अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी प्रत्येक जण आपापल्या परीने खरेदी करीत आहे. मिठाई विक्रेत्यांनी आकर्षक पॅकींगमध्ये मिठाई उपलब्ध करून दिली आहे. ड्रायफ्रुट पॅकींग, मिक्स बर्फी, मिक्स स्वीट, मिक्स काजु कतली, काजु स्वीट मिक्स, काजु बाईट्स असे विविध पॅकींग तयार करण्यात आले आहेत.
त्याशिवाय, सोनपापडी, सुक्या मेव्याचे आकर्षक बॉक्स, सुक्या मेव्याची खास बनविलेली टोकरी लक्ष वेधून घेत आहे. दोन महिने टिकू शकतील अशा पॅकींगच्या खाद्यपदार्थांचे हॅंपर बनवुन देखील त्याची विक्री सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मिठाई विक्रीसाठी 50 टक्के प्रतिसाद घटला आहे. दोन महिने टिकू शकतील असा सुका मेवा, हॅंपरचे पॅकींग करण्यावर आम्ही यंदा जास्त भर दिला आहे, अशी माहिती मिठाई विक्रेते सुरेश चौधरी यांनी दिली.