पावसाळ्यात विजेच्या तक्रारींना प्राधान्य द्या – आमदार जगताप

पिंपळे गुरव – पावसाळ्यात विजेसंदर्भातील नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याला महावितरणने प्राधान्य द्यावे, अशी सूचना भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली. पावसाळ्यात विद्युत उपकरणे आणि तारांमुळे विद्युत अपघाताच्या घटना घडतात. त्या पार्श्‍वभूमीवर विजेचे धोके आणि दुर्घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना राबविण्यात येतील.

या संदर्भात ही बैठक झाली. त्यामध्ये महावितरणकडूनही काही सूचना देण्यात आल्या. विद्युत ग्राहकांनी सूचनांचे पालन करून सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले. बैठकीला महावितरणचे अधिक्षक अभियंता कागल पुल्लीवार, कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर, चिंचवड वितरण विद्युत समितीचे अध्यक्ष संजय मरकड, नगरसेविका उषा मुंढे, माई ढोरे, आरती चोंधे, मोना कुलकर्णी, भारती विनोदे, नगरसेवक सागर आंघोळकर, तसेच दीपक जाधव, राजेश शर्मा आदी उपस्थित होते.

विद्युत खांबांना दुचाकी टेकवून ठेवू नये, वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्या-तुकड्यात जोडू नये, विद्युत उपकरणांची दुरुस्ती करताना मेन स्विच बंद करावा अशा सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केल्या. पावसाळ्यातील विद्युत दुरुस्तीची कामे, विद्युत पुरवठा अधिक वेळ बंद होणे, रस्त्यावरील व चौकातील वाहतुकीस, रहदारीस आणि पादचाऱ्यांना अडचणीचे ठरणारे ट्रान्सफॉर्मर, फिडर पीलर यांची योग्य जागा आणि सद्यःस्थिती या संदर्भात या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.