शिरवळ येथे खुनाचा प्रयत्न; युवकाला अटक

शिरवळ -भांडणे सोडविल्याच्या रागातून शिरवळ, ता. खंडाळा येथील राजेंद्र दत्तात्रय राऊत (वय 41) यांच्या गळ्यावर चाकूने वार करत खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शुभम लाला राऊत (वय 25, रा. फुल मळा, शिरवळ) याला शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजेंद्र राऊत यांचे कुटुंब शिरवळ येथे राहते. त्यांचे मित्र प्रमोद शिंदे यांना शुभम राऊत हा शनिवारी (दि. 30 मे) सायंकाळी 5.30 च्या सुमारास शिवीगाळ करत होता. त्यावेळी राजेंद्र राऊत यांनी शुभमला हाकलून लावले होते. त्यानंतर राजेंद्र राऊत हे रात्री 9.30 च्या सुमारास घरी असताना शुभम त्यांच्या घरी गेला.

प्रमोद आणि माझ्या भांडणात का पडतोस, असे म्हणत शुभमने कमरेला लावलेला चाकू काढून राजेंद्र राऊत यांच्या गळ्यावर दोन वार केले. याप्रकरणी शुभम राऊत याच्यावर शिरवळ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत राजेंद्र राऊत यांनी फिर्याद दिली. खंडाळा येथील न्यायालयाने शुभमला उद्या, दि. 2 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.