नाशिक – नाशिक शहरासह जिल्ह्यातील वातावरण निरभ्र होते. मात्र मागील काही दिवसांच्या तुलनेत आजचे तापमान मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले. अशातच सायंकाळी जिल्ह्यातील काही भागातील वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. लासलगाव परिसरात मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी लावली असून असह्य उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाल्याचे दिसून आले.
नाशिक शहराचा जिल्ह्यात कालपासून उन्हाची तीव्रता वाढलेली असून आज सकाळपासूनच नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान दिसून आले. कालही जिल्ह्यातील अनेक भागात अनेक घरांचे नुकसान झाले. आजही जिल्ह्यातील लासलगावसह कळवण परिसरात वादळीवारासह मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली.
मात्र, वादळी वाऱ्याने घरांसह शाळेचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. नाशिकच्या कळवण तालुक्यातील पिळकोस येथे झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे एका पोल्ट्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने पोल्ट्री शेड कोसळून जमीनदोस्त झाला आहे. कोसळलेल्या पोल्ट्री शेडमुळे पोल्ट्रीतील काही पक्षी मृत्युमुखी पडले आहेत. पोल्ट्रीचा पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.