बळीराजाचे लक्ष मान्सूनपूर्व पावसाकडे

कराड  – यंदा उन्हाळ्यात पिकांसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या वळिवाने पूर्णतः पाठ फिरवल्याने तालुक्‍यातील बळीराजाचे लक्ष मान्सूनपूर्व पावसाकडे लागले आहे. कडक उन्हाळा, विहिरींनी गाठलेला तळ, वळवाच्या पावसाने दिलेली हुलकावणी यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला तरी मान्सून पूर्व सरी कोसळाव्या, या आशेने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. गेले दोन दिवसांपासून तालुक्‍यात ढगाळ वातावरण झाले आहे. पण पाऊस काही पडेना झाला आहे. यंदा सरासरी एवढा पाऊस राज्यात पडेल असे हवामान खात्याने पावसाळ्यापूर्वीच जाहीर केले होते. मात्र जून महिन्यात पावसाने सरासरी न गाठल्याने शेतकरी वर्ग चांगलाच हवालदिल झाला होता. पुरेसा पाऊस न पडल्यास आपल्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.

या कारणामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या नव्हत्या. मात्र जुलै महिना उजाडला तसा पावसाने जिल्ह्यासह कराडला झोडपून काढले. सततधार पावसामुळे मसूर, उंब्रज, काले, वाठार, रेठरे, वडगाव, आटके, शेणोली, तांबवे यासह तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लगबग करत पेरणीची कामे उरकली. त्यानंतर पिके उगवणीसाठी आवश्‍यक पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील या पावसामुळे समाधान दिसू लागले. खरीप पिकांचा हंगाम चांगला गेला, मात्र यंदा उन्हाळ्यातील वाढत्या झळांमुळे व वळीव न पडल्याने रब्बी हंगामावर याचा परिणाम दिसून येत आहे. यामुळेच भुईमूग, हायब्रीड, सोयाबीन, गहू, उडीद, मका यांसारख्या पिकांच्या उत्पादनावर घातले आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून अपवाद वगळता तालुक्‍यात वळिवाचा पाऊस झाला नाही.

राज्यात यंदा उष्णतेची लाट आली. याचा परिणाम म्हणून तालुक्‍यातील तापमान ही चाळीशीच्यावर गेले. याचा परिणाम विहिरी, ओढे, कूपनलिका, नद्यांनी तळ गाठला. पिकांना पुरेसे पाणी नाही, त्यामुळे शेतकरी वळीवाच्या प्रतीक्षेत होता. मात्र वळीवानेही हुलकावणी दिल्याने आता सर्व मान्सूनपूर्व पावसाकडे लक्ष लागले आहे. पावसाळा सुरू होण्यास अजून पंधरा दिवसाचा तरी अवधी आहे. तत्पूर्वी मान्सूनपूर्व पाऊस झाल्यास पिके व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही अंशी तरी मार्गी लागून पिकांना नवसंजीवनी मिळेल अशी आशा बळीराजा बाळगून आहे.

तालुक्‍यात यंदा भयावह स्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने पिकांना आवश्‍यक असलेले पाणी दोन-दोन महिने मिळालेले नाही. पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असलेला पाणीपुरवठा न मिळाल्याने भुईमूग, मका, सोयाबीन, उडीद, तूर, मूग, गव्हू, यासारख्या रब्बी पिकांची नियमित वाढ झालेली नाही. याउलट या पिकांना पाणी मिळत नसल्याने पिके करपली. दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांच्या उत्पादनावर देखील या पावसाचा परिणाम आता जाणवणार आहे.

यावर्षी जिल्ह्यातील विहिरी, तलाव हे कोरडे पडले असून शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कराड तालुक्‍यातील बऱ्यापैकी शेतजमीन ही बागायत असल्याने शेतामध्ये जनावरांचा चारा उपलब्ध झाला. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे शिवारातील चारा पाण्याविना जळून गेला आहे. त्यामुळे पिकांबरोबरच चाऱ्यासाठी वापरात येणाऱ्या गवत, उसाची पिके पाण्याविना करपली आहेत. चाऱ्याच्या कमतरतेमुळे आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

कैलास पाटील , शेतकरी 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.