प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे 1 हजार 114 अर्ज रद्द

अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाकडून अर्ज रद्द करण्याची कारवाई

 

पुणे – प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती ऑनलाइन अर्जात 1 हजार 114 विद्यार्थ्यांची चुकीची माहिती भरल्याचे उघड झाले. हे अर्ज रद्द करण्याची कारवाई अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने केली आहे.

पहिली ते दहावीपर्यंतच्या धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. मुस्लीम, ख्रिश्‍चन, शीख, पारशी, बौद्ध, जैन धर्मिय विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. यांतर्गत शिष्यवृत्तीसाठी 2 लाख 85 हजार 451 एवढा विद्यार्थ्यांचा कोटा निश्‍चित आहे.

विद्यार्थ्यांच्या अर्जांची ऑनलाइन नोंदणी करून शाळास्तरावर अर्जांची व त्याची माहिती पडताळणी करून तो पुढे पाठविण्याची आवश्‍यकता असते. मात्र, काही शाळास्तरावर अर्जांची व्यवस्थित पडताळणी झाली नसल्याची बाब उघड झाली आहे.

जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जात असताना त्यातही फी घेतल्याचे दाखविले आहे. वसतीगृह दाखवून जादा फी लाटण्याचा प्रयत्न झाल्याचेही उघडकीस आले आहे. हा प्रकार प्रामुख्याने अमरावीत विभागात जास्त आढळून आला आहे. यात नवीनमधले 1 हजार 27, तर नूतनीकरणातील 87 अर्ज रद्द केले आहेत.

2020-21 या वर्षासाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी एकूण 78 कोटी 56 लाख रुपयांच्या आलेल्या निधीचे वाटप झाले आहे. नवीनमध्ये 2 लाख 56 हजार 466, तर नूतनीकरणातील 4 लाख 48 हजार 733 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. काही विद्यार्थ्यांचे अर्ज तपासणीत रद्द झालेले आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील नवीन काही दुसऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबत केंद्र शासनाकडून आठवड्याभार निर्णय होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.