प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी केंद्राचा 69 कोटींचा निधी

31 मार्चअखेर पात्र विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात शिष्यवृत्तीची रक्‍कम जमा होणार

 

पुणे – धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी केंद्र शासनाकडून 69 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मुस्लीम, ख्रिश्‍चन, शीख, पारशी, बौद्ध, जैन धर्मिय इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. 31 मार्चअखेर सर्व पात्र विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात शिष्यवृत्तीची रक्‍कम जमा करण्याच्या दृष्टीने अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण विभागाने हालचाली सुरू ठेवल्या आहेत.

नूतनीकरणातील 4 लाख 31 हजार 355, तर नवीन 1 लाख 94 हजार 334 विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची रक्‍कम नुकतीच केंद्र शासनाकडून उपलब्ध झाली आहे. उर्वरित रक्‍कम लवकरच मिळणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नूतनीकरणातील 81 व नवीनमधले 765 अशा एकूण 846 विद्यार्थ्यांचे अर्ज बाद झाले. जिल्हा परिषदांच्या अनुदानित शाळांमधून काही विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. वस्तीगृहाची सुविधा दाखवून जादाची शिष्यवृत्ती मिळविण्याचा या विद्यार्थ्यांचा प्रयत्न होता.

गेल्या वर्षभरापासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने वस्तीगृहेही बंद आहेत. त्यामुळे संबंधीत नियमबाह्य अर्ज रद्द केले आहेत. यामुळे 70 लाख रुपयांची बचत झाली. यातून गरजू व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देता येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.