पुणे – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या तंत्रज्ञानाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणात ज्येष्ठ नागरिकासह दोघांना सत्र न्यायाधीश सुधाकर सोनवणे यांनी अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे.
दोघांनी प्रथमदर्शनी गुन्हा केल्याचे दिसून येत नाही. एफआयआरमध्ये दोघांचे नाव नव्हते. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघांकडून कोणतीही रिकव्हरी झालेली नाही. गुन्हा घडल्याच्या पंधरा तास आधीच एफआयआर दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दोघांना अटकपूर्व जामीन देण्यात यावे, असा बचाव पक्षातर्फे अॅड. पुष्कर एन.पाटील आणि अॅड. अनुज मंत्री यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा आदेश दिला.
गुरूमितसिंह सैनी (वय 65) आणि सरबजितसिंह सैनी (वय 35 दोघेही, रा. पिंपळे सौदागर) अशी त्या दोघांची नावे आहेत. याबाबत महेश भागवत (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे. ते काळेवाडी शाखा, पिंपळे सौदागर येथे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. 21 डिसेंबर रात्री 11 ते 22 डिसेंबर रोजी सकाळी 7 या वेळेत कर्तव्यावर होते. त्यावेळी रात्री दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अटकपूर्वसाठी अर्ज दाखल केल्यानंतर पोलिसांनी म्हणणे दाखल केलेच नाही. 17 व्या तारखेला अंतरिम अटकपूर्व मंजुर करण्यात आला. तर, आता 25 व्या तारखेला अटकपूर्व मंजुर करण्यात आल्याची माहिती अॅड. पुष्कर पाटील यांनी दिली. विविध अटींवर हा निकाल देण्यात आला.