Pravin Tarde | Murlidhar Mohol | Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील ११ मतदार संघात मतदान पार पडत आहे. यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघाचा समावेश आहे.
पुण्यातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लोकसभेची लढत आहे. मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिन्ही तगडे नेते मानले जात आहे. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होणार आहे.
अशातच मतदानाच्या दिवशी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची एक फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. ‘शहरभर मुरलीधर’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारानिमित्त पुण्यात काही दिवसांपूर्वी महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा हजेरी लावली होती.
तर प्रवीण तरडेंनी या सभेत केलेलं भाषण विशेष चर्चेत आलं होतं. यावेळी त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना सर्वाधिक मतांनी जिंकून आणण्याचं आवाहन पुण्याच्या नागरिकांना केलं होतं.
दरम्यान, अभिनेता सुबोध भावे याने देखील पुण्यातील सिटी पोस्ट जवळील मतदान केंद्रावर पत्नीसह मतदानाचे कर्तव्य पार पडले. “बदल घडला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या.
मला राजकारणाबद्दल काहीच बोलायचं नाही. कारण त्याविषयी शून्य आवड आहे. पण मला माहिती आहे हे माझं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते मी पार पडलं. त्यामुळे मतदान करा,” असं आवाहन सुबोध भावेने केले आहे.