शिक्रापूर – जसे पंढरपूर व शिवनेरी ला प्रशासकीय पदाधिकाऱ्यांचे नियमावलीत अभिषेक असतो, तशा पद्धतीने प्रशासनातील मोठ्या पदाधिकाऱ्यांनी या दिवशी येथे येण्याचे त्यांच्या नियमावलीत आखून घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे छत्रपतींच्या बलिदानस्मरण दिनी शासकीय सुट्टी असावी, असे मत सिनेअभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले.
तरडे म्हणाले, श्रीक्षेत्र वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथील शंभूछत्रपतींच्या समाधीस्थळी आम्ही गेली 20 वर्षे येत असतो, आज छत्रपती संभाजी महाराजांची 333वी पुण्यतिथी आहे. छत्रपती संभाजी महाराजांना कोणी मारले नाही, तर स्वराज्याच्या या छत्रपतींनी मरण स्वीकारले आहे. प्रत्येक भारतीयांसाठी हा दिवस महत्वाचा आहे; मात्र ज्याप्रमाणे शिवजयंतीला शासकीय सुट्टी असते. त्याप्रमाणे आजच्या या बलिदान स्मरणदिनी देखील शासकीय सुट्टी असावी, म्हणजे प्रत्येक माणूस या समाधीवर माथा टेकवायला येथे येईल.
मी या दिवसाचे स्मरण करतो, प्रत्येकाने हा दिवस हृदयात कोरला पाहिजे कारण आपल्या या राजाने हसत हसत स्वराज्यासाठी मरण स्विकारले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, पुणे जिल्हा बॅंकेच्या माजी संचालिका डॉ. वर्षा शिवले, माजी सरपंच रेखा शिवले, सोसायटीचे चेअरमन प्रफुल्ल शिवले, सचिन भंडारे यांसह आदी उपस्थित होते.