पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले होते. या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आक्रमक झाले असून त्यांनी दरेकर यांचे विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
त्यानंतर पोलीसांनी दरेकर यांचेवर भादंवि कलम 509 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
चाकणकर यांनी दिलेल्या तक्रारीत सांगितले की, प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रीय एकात्मेतला बाधा पोहचवत राष्ट्रवादी कॉंग्रेसची बदनामी करुन व महिलांच्या विनयशीलतेला धोका पोहचविणारे वक्तव्य केले आहे.
शिरुर येथे 13 सप्टेंबर रोजी आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक यांचे 230 व्या जयतीं निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे भाषणात दरेकर यांनी जाणुनबुजून राष्ट्रवादी कॉंग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे असे वक्तव्य केले आहे.
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात 14 सप्टेंबर रोजी प्रवेश करणार असल्याचे बातम्या प्रसारमाध्यमात येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी संबंधित विधान केले आहे त्यामुळे त्यांनी केलेल्या विधानामुळे एक स्त्री म्हणून माझे मनास लज्जा उत्पन्न झाली आहे.
दरेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तमाम महिला वर्गाचे मनात लज्जा उत्पन्न होवुन महिलांच्या विनयशीलतेचा अपमान झालेला आहे.