मुंबई : त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद सध्या राज्यात पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत असून त्याला हिंसक वळण देखील लागले आहे. दरम्यान, या सर्व घटनेवरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले आहे. त्रिपुरात घटना घडते म्हणून महाराष्ट्रात दादागिरी करणार असाल, तर खपवून घेणार नाही, असा इशारा दरेकर यांनी दिला आहे. तसेच यावर महाराष्ट्र सरकारने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास हे प्रकरण हाताबाहेर जाईल, असेही प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
प्रविण दरेकर यांनी अमरावतीमध्ये घडलेल्या हिंसक घटनेचा निषेध करत “त्रिपुरात घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात अशा प्रकारचा उद्रेक होता कामा नये. तुम्ही इथली शांतता भंग करणार असाल, तर महाराष्ट्र सरकारने त्यावर तातडीने कारवाई करावी. अशा प्रकारचा जातीय तणाव निर्माण होणार असेल तर ते महाराष्ट्रासाठी योग्य राहणार नाही. मग अशा प्रवृत्ती त्रिपुरात घटना घडते म्हणून इथं दादागिरी करणार असेल तर महाराष्ट्रात चालणार नाही. खपवून घेणार नाही. सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा हे प्रकरण हाताबाहेर जाईल.”असे म्हटले आहे.
दरम्यान, त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ अमरावतीत काल मुस्लीम समाजाने काढलेल्या मोर्चा दरम्यान हिंसाचार झाला. त्याचा निषेध म्हणून आज भाजपच्या वतीने अमरावती बंद पुकारण्यात आला. या बंदला हिंसक वळण लागले आहे.
भाजपा कार्यकर्त्यांनी शहरात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नमुना परिसर तसेच अंबापेठ परिसरात अनेक दुकाने फोडण्यात आली. एका हॉस्पिटलवर देखील दगडफेक करण्यात आली आहे.