कॉंग्रेसच्या प्रवीण चक्रवर्ती यांची हकालपट्टी? 

डेटा विश्‍लेषण विभागाचे प्रमुख म्हणुन जबाबदारी 
प्रसारमाध्यमांमधून काल्पनिक माहिती प्रसारित -चक्रवर्ती

नवी दिल्ली  – लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या धक्‍क्‍यातून कॉंग्रेस पक्षनेतृत्व आणि कार्यकर्ते सावरलेले नाहीत. दरम्यान, देशातील जनमताबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याने पक्षाने डेटा विश्‍लेषण विभागाचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांची हकालपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रवीण चक्रवर्ती यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. तसेच प्रसारमाध्यमांमधून काल्पनिक माहिती प्रसारित केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

चक्रवर्ती यांच्या या वक्तव्यानंतरही डेटा विभागाने दिलेल्या फीडबॅकबाबत कॉंग्रेसचे पक्षनेतृत्व खूप नाराज आहे. डेटा विभागाने नियमितपणे गोपनीय पद्धतीने दिल्या जाणाऱ्या पोलवर आधारित पूर्णपणे चुकीची माहिती पुरवली. पक्षाचा डेटा विभाग जनमानसाचा कौल जाणून घेण्यात अपयशी ठरला, असे कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.

कॉंग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, चक्रवर्ती यांनी घेतलेले पोल आणि निकालांवर थेट नाराजी व्यक्त केली होती, तसेच ही माहिती विश्‍वासार्ह नाही, असे सांगितले होते. तसेच बुथस्तरावर सदस्य जोडण्यासाठी सुरू करण्यात आलेले शक्ती ऍपही पूर्णपणे अपयशी ठरले. तसेच कॉंग्रेस अध्यक्षांसोबत जवळीक करण्यासाठी चक्रवर्ती यांनी अनेक विश्‍वासू नेत्यांना दूर करण्याचे काम केले, असा आरोपही कॉंग्रेसमधील काही नेत्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.