पुणे : वयाच्या 41व्या वर्षी आयपीएल खेळणारा प्रवीण तांबे, ज्यांची कारकीर्द अशा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, ज्यांना वाटते की वय हे नवीन गोष्टी सुरू करण्यात अडथळा आहे. 2013 मध्ये प्रवीण तांबे आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला होता.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळण्यासाठी सतत 20 वर्षे वाट पाहिल्यानंतर प्रथम आयपीएल आणि नंतर मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळवणारा प्रवीण आपल्या छोट्याशा कारकिर्दीत अनेकांना सातत्याने प्रयत्न करण्याच्या प्रेरणा देऊन गेला. आता याच प्रवीणच्या जीवणावर बायोबिक येतोय. याचे चित्रकरण सुरु झाले असून यामध्ये श्रेयस तळपदे प्रवीणची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेट वर्तूळात प्रवीणची चर्चा सुरु झाली आहे.
असा आहे प्रवीणचा प्रवास
प्रवीण तांबेचा जन्म 8 ऑक्टोबर 1971 रोजी मुंबई येथे झाला. त्याचे वडील विजय तांबे जॉन्सन अँड जॉन्सन संघासाठी क्रिकेट खेळायचे. त्यावेळी प्रवीणही वडिलांसोबत खेळायला जात असे, तेथूनच प्रवीणला क्रिकेटची आवड निर्माण झाली.
1994 ते 2004 पर्यंत ओरिएंट शिपिंग संघाचा सदस्य असलेला प्रवीण सुरुवातीला वेगवान गोलंदाज होता. पण ओरिएंट शिपिंगमधील त्याचा कर्णधार अजय कदमने त्याला लेग-स्पिनकडे वळण्याचा सल्ला दिला. आणि या नवीन गुणवैशिष्ट्यामध्ये त्याला बरेच यश मिळाले आणि त्यानंतर त्यांने कधीही मागे वळून पाहिले नाही. प्रवीण तांबे मुंबईतील सुप्रसिद्ध शिवाजी पार्क जिमखाना संघाचाही भाग होता. तांबेने एके काळी भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजीने प्रभावित केले होते.
कित्येक वर्ष सातत्यपूर्ण कामगरी करुनही प्रवीणला ना मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळत होते ना राष्ट्रीय स्तरावर कोणी त्याच्या कामगिरीची दखल घेत होते. शेवटी प्रवीणने घर चालवण्यासाठी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवरील संपर्क अधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मात्र, असे करताना त्याने त्याचा खेळ कधीच बंद केला नाही.
प्रवीण तांबेची आयपीएल कारकीर्द
प्रवीण तांबेला 2013 मध्ये पहिल्यांदा आयपीएलमध्ये संधी मिळाली. देशांतर्गत टी-20 स्पर्धेदरम्यान त्याला राहुल द्रविड आणि पॅडी अप्टन यांनी हेरले आणि राजस्थान रॉयल्ससाठी करारबद्ध केले.
प्रवीणला राजस्थान रॉयल्सने जेव्हा ट्रायल्ससाठी बोलवले तेव्हा एकाही फलंदाजाला प्रवीणच्या फिरकीचा सहजपणे सामना करता आला नाही. प्रवीणच्या या कामगिरीने प्रभावीत होत, राहुल द्रविडने नमूद केले की, त्याला त्याच्या वयाची पर्वा नाही. प्रवीणच्या कौशल्याला तुम्ही वयाचा बंधनात अडकवू शकत नाही. 2013 ते 2015 पर्यंत राजस्थानकडून खेळल्यानंतर प्रवीणला 2016मध्ये गुजरात लायन्स तर 2017मध्ये सनराझर्स हैदराबादचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली.
प्रवीण तांबेने राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यातील सामन्यात 7 मे 2013 रोजी पदार्पण केले. पुढे 5 मे 2014 रोजी अहमदाबाद येथे कोलकाता विरुद्धच्या सामन्या शानदार हॅटट्रिक घेत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. 2014च्या आयपीएल स्पर्धेत प्रवीण (25 व्या सामन्यापर्यंत) सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. प्रवीण तांबने 33 आयपीएल सामने खेळले असून 30.46 च्या सरासरीने 28 बळी घेतले आहेत.
प्रवीण तांबे 2020 च्या लिलावात आयपीएल संघाने कराबबद्ध केलेला घेतलेला सर्वात वयस्कर (48 वय) खेळाडू ठरला. केकेआरने अनुभवी फिरकीपटूला 20 लाख रुपयांना विकत घेतले. मात्र, त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल खेळण्यास बंदी घातली होती.
पुढे कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सचे प्रतिनिधीत्व करणारा प्रवीण ही स्पर्धा खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.