एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नको;प्रवीण दरेकरांची धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई: काही दिवसापूर्वी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. याच प्रकरणावरून मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आता विरोधी पक्षाकडून पुन्हा एकदा करण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नको. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणल्यानंतर त्यांनी 20 दिवसानंतर मंत्र्याचा राजीनामा घेतला असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. विरोधी पक्ष, जनता आणि मीडियाचा दबाव वाढला नसता तर त्यांनी राजीनामा घेतला नसता. पण उशिरा का होईना नैतिकतेच्या आधारे मंत्र्याचा राजीनामा घेतला. आता पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. पंकजा यांची मागणी रास्तच आहे. नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून मुंडेंनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता. महाविकास आघाडीतच एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नको, असे सांगत मुंडे यांनीही त्वरीत राजीनामा द्यावा. राष्ट्रवादीने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.

धनंजय मुंडेंचा निर्णय त्यांच्या पक्षाने घ्यावा. त्यांनी भूमिका ही नैसर्गिक घ्यायला पाहिजे. धनंजय मुंडे प्रकरणाचे समर्थन करू शकत नाही. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही आमच्या पक्षाचीही मागणी आहे. राजकारणात काय पायंडे चाललेत ते स्त्रियांच्या दृष्टीने दुर्दैवी आहेत. झगडणाऱ्या स्त्रीसाठी, चांगला काम करणाऱ्या स्त्रीसाठी एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले, असे भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. जर कोणावर अशा प्रकारचे बोट दाखवलं गेलंय. त्यांनीच स्वतःची भूमिका ही स्वतःहून घेतली पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. मग राजकीय जीवनामध्ये लोक त्यांच्याकडे मान उंचावून बघतील. व्यक्तिगतही मी या गोष्टीचं कधीच समर्थन करू शकत नाही. ज्यांच्यावर आरोप होतात, त्यांनीच भूमिका घ्यायला हवी, असेही त्या म्हणाल्या.

सरकार टिकवण्यासाठी किंवा एखादी आघाडी टिकवण्यासाठी काही लोकांना पाठिशी घालणं योग्य नाही. त्यामुळेच पूजा चव्हाण प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी. कोणत्याही दबावाखाली हा तपास होऊ नये. सध्या या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने सुरू आहे तो समाधानकारक नाही. त्यामुळेच देशालाही आदर्श घालून दिला जाईल असा या प्रकरणाचा तपास करण्यात आला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.