वाशिम – खासदार भावना गवळी यांचे पूर्वाश्रमीचे पती कॅप्टन प्रशांत सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भावना गवळी ‘शिंदे गटा’त सामील झाल्या होत्या. आता सुर्वे यांच्या शिवसेना प्रवेशाने गवळी यांच्यासमोर तगडं आव्हान असल्याचे मानले जात आहे.
2013 साली खासदार भावना गवळी आणि प्रशांत सुर्वे यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर सुर्वे यांनी 2014 मध्ये गवळी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. प्रशांत सुर्वे हे मुळचे वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.
शिवसेना प्रवेशानंतर कॅप्टन सुर्वे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “2014 सालीच शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी मी उद्धव ठाकरें यांना भेटलो होतो. पण परिस्थिती तशी नाही असं त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे मत होते. त्यावेळी मला पक्षाकडून काही जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.”
दरम्यान, भावना गवळी या शिंदे गटात सामील झाल्या कारण त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला होता अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु होती.