मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. महिनाभरापासून फरार असलेल्या कोरटकरला कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तेलंगणातून अटक केली. आता त्याला कोल्हापूरला आणलं जात असून, या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
“कोल्हापूर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कोरटकरला पकडलं. आता त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. शिवरायांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही,” असं फडणवीस म्हणाले.
पोलिसांनी कसा लावला छडा?
२५ फेब्रुवारीपासून कोरटकर फरार होता. त्याने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केल्यानंतर इंद्रजीत सावंत यांनी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नागपुरातून पळालेला कोरटकर चंद्रपूरमध्ये लपला होता. कोल्हापूर पोलिस त्याला पकडण्यासाठी गेले असता तो तिथूनही पसार झाला. एका वृत्तानुसार, तो दुबईत पळाला असल्याचीही चर्चा होती. पण अखेर तेलंगणातून त्याला ताब्यात घेण्यात आलं. कोल्हापूर पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा करत त्याचा माग काढला आणि नागपूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई यशस्वी केली.
फडणवीसांचं वक्तव्य –
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस म्हणाले, “पोलिसांनी उत्तम कामगिरी करत कोरटकरला अटक केली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन केला जाणार नाही. भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) त्याच्यावर कठोर कारवाई होईल.” कोरटकरवर आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले असून, हे सर्व गुन्हे कोल्हापूरला वर्ग केले जाणार आहेत.
कोरटकरला कोणी मदत केली?
कोरटकरला कोल्हापूरला आणण्यासाठी पोलिसांना १०-१२ तास लागू शकतात. आल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी होईल आणि अहवाल सादर केला जाईल. अॅड. असीम सरोदे म्हणाले, “कोरटकरला अटकेत ठेवणं गरजेचं आहे. त्याला लपण्यासाठी कोणी मदत केली, हे समोर यायला हवं. त्याचे सहआरोपी कोण असू शकतात, याचा तपासही आवश्यक आहे. त्याला मदत करणारे जवळचे अधिकारी किंवा नातेवाईक असू शकतात. तपासात दिशाभूल होण्याची शक्यता आहे, पण पोलिसांनी नीट तपास केल्यास त्याला शिक्षा होऊ शकते.”
दरम्यान, कोरटकरच्या अटकेनंतर आता त्याच्यावरील कायदेशीर प्रक्रिया तीव्र होणार आहे. त्याला मदत करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढवली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांच्या कारवाईचं स्वागत होत आहे. आता कोरटकरला कोणती शिक्षा होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.