Prashant Kishor | माजी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठा खुलासा केला आहे. ते जन सूरज पक्ष चालवत आहेत, यासाठी खर्चही मोठा आहे. आता खुद्द प्रशांत किशोर यांनी मोठं गुपित उघड केलं आहे. एका निवडणूकीसाठी सल्ला देण्यासाठी ते राजकीय पक्षांकडून किती फी घेतात हे त्यांनी सांगितले आहे.
बिहारमधील बेलागंज, इमामगंज, रामगड आणि तरारी या चार विधानसभा जागांसाठी 13 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. यात प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. किशोर यांनी या चारही जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. त्यावेळी एका प्रचार सभेदरम्यान त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान पैसे कोठून मिळतात हे सांगितले.
काही लोक त्यांच्यावर आरोप करत होते की, त्यांना भाजपकडून निधी दिला जात आहे आणि ते भाजपची ‘बी टीम’ आहेत. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “जेव्हा मी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसाठी काम करत होतो आणि भाजपविरोधात लढत होतो तेव्हा हे लोक कुठे होते? भाजपने 100 जागाही जिंकल्या तर मी रणनीती बनवणे बंद करेन, असे मी जाहीर केले होते. जर मी भाजपची बी टीम आहे तर मी ममता बॅनर्जींसाठी का काम करणार?” असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, “मला कमकुवत समजू नका. देशातील 10 राज्यांमध्ये सरकार बनवण्यात माझा हातखंडा आहे. मी राजकीय पक्षांना सल्ला देतो आणि यासाठी मी बिहारमधील कोणीही कल्पनेपेक्षा जास्त पैसे आकारतो. एका निवडणुकीसाठी माझी फी किमान १०० कोटी रुपये आहे. आता तुम्ही स्वतःच अंदाज लावू शकता की माझे पैसे कुठून येतात. मी भाजपकडून पैसे घेतो, अशा अफवा विशेषतः मुस्लिमांमध्ये पसरवल्या जात आहेत. मला माझे घर भरण्यासाठी जनतेकडून पैसे घेण्याची गरज नाही.”