पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे वय वाढले आहे. त्यांना आता राजकीयदृष्ट्या एकाकी पडल्यासारखे वाटू लागले आहे. ज्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही अशा लोकांच्या गोतावळ्यात ते अडकले असून, त्यांना सध्या भ्रमनिरास झाल्या सारखेही वाटू लागले आहे, अशी टिका माजी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर ( Prashant Kishore ) यांनी केली आहे.
प्रशांत किशोर ( Prashant Kishore ) हे भाजपसाठी काम करीत आहेत असा दावा नितीशकुमार यांनी केला होता. तसेच त्यांनी आम्हाला संयुक्त जनता दल हा पक्ष कॉंग्रेस मध्ये विलिन करण्याचा प्रस्ताव दिला होता असेही नितीशकुमार यांनी म्हटले होते. त्याला उत्तर देताना प्रशांत किशोर यांनी प्रतिक्रीया दिली.
ते म्हणाले की, “नितीशकुमार एक गोष्ट बोलू लागतात आणि काहीतरी वेगळंच बोलून ते थांबतात. त्यांच्या बोलण्यातही आता काही ताळतंत्र राहिलेलं नाही. मी भाजपसाठी काम करतोय असं जर त्यांना वाटत असेल, तर मी कॉंग्रेसला बळकट करणारं पाऊल का सुचवू शकतो? असा सवालही त्यांनी नितीशकुमार यांना विचारला आहे. त्याचबरोबर नितीशकुमार यांच्या वक्तव्यांमध्ये कोणताही अर्थ नाही असेही प्रशांत किशोर ( Prashant Kishore ) यांनी म्हटले आहे.