प्रशांत किशोर आता ममता बॅनर्जींचे मार्गदर्शक

कोलकाता (पश्‍चिम बंगाल) – राजकीय धोरणकार प्रशांत किशोर आता पश्‍चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसचे राजकीय धोरण मार्गदर्शक म्हणून काम बघणार आहेत. लोकसभेसाठी 2014 साली झालेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या मोठ्या विजयाचे श्रेय रणनितीकार या नात्याने प्रशांत किशोर यांना दिले जाते. गुरुवारी प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आणि आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी बॅनर्जी यांच्यासाठी रणनितीकार म्हणून काम करण्याचे त्यांनी मान्य केल्याचे समजते आहे.

प्रशांत किशोर यांनी काही महिन्यांपूर्वीच बिहारमध्ये संयुक्‍त जनता दलामध्ये प्रवेश केला होता. मात्र तेथे अंतर्गत सत्तासंघर्षामुळे त्यांना बाजूला टाकल्यासारखे वाटायला लागले होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा राजकीय रणनितीकार म्हणून काम करायचे ठरवले आहे. त्यासाठी या महिन्यानंतर ते बॅनर्जी यांच्याबरोबर कामाला सुरुवात करणार आहेत.

पश्‍चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षाच्या अखेरीस होणार आहेत. अलिकडेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस पक्षाला भाजपकडून जोरदार फटका बसलेला आहे. पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसने लोकसभेच्या 22 तर भाजपने 18 जाग जिंकल्या आहेत.

प्रशांत किशोर यांनी आंध्रप्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांनाही मार्गदर्शन केले होते. त्याचा परिणाम म्हणून वायएसआर कॉंग्रेसने आंध्र विधानसभेतील 175 पैकी 151 जागा जिंकल्या आणि जगनमोहन रेड्डी आंध्रचे मुख्यमंत्री झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.