“प्रशांत किशोर यांनीही दीदींची साथ सोडली”

नवी दिल्ली – निवडणूक रणनितीकार म्हणून अलिकडच्या काळात नावारूपास आलेले प्रशांत किशोर गेल्या काही काळापासून प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस या पक्षासाठी काम करत होते. मात्र त्यांची नुकतीच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती करत त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला आहे. यावरून भारतीय जनता पार्टीने ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रशांत किशोर यांनीही आता दीदींची साथ सोडली अशी खोचक टीप्पणी भाजपने केली आहे.
याबाबत बोलताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की निवडणूक होण्याच्या आणि तिचा निकाल लागण्याच्या अगोदरच ममता दीदींच्या प्रमुख सल्लागाराने नव्या घरात आश्रय घेतला आहे. अमित शहा आणि जे. पी. नड्डा नेहमी म्हणतात की बंगालमध्ये भाजपला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील.

मात्र तथाकथित राजकीय सल्लागार हे अमान्य करत होते. आता त्यांनी दुसऱ्या घरात आश्रय घेतल्यामुळे त्यांनीही एकप्रकारे शहा आणि नड्डा यांचा दावा मान्य केल्याचे सिध्द होते, असे पात्रा यांनी म्हटले आहे.

गेल्या काही काळात ममतांच्या पक्षातून दीड डझन आमदार आणि काही मंत्र्यांनीही बाहेरचा रस्ता धरला आहे. ममतांवर काहींनी थेट टीका केली असली तरी बहुतांश नेत्यांनी प्रशांत किशोर यांच्यावरच निशाणा साधला होता. आम्ही इतकी वर्षे दीदींच्या खांद्याला खांदा लावून पक्ष उभा केला आणि सत्तेवर आणला. राजकारणाच्या बाहेरून आलेली एक व्यक्ती आता आम्हाला पक्ष कसा चालवायचा हे शिकवते आहे, असा नाराज नेत्यांचा सूर होता.

मात्र तरीही ममतांनी व त्यांच्या सल्लागार मंडळींनी प्रशांत किशोर यांना कामाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. आज पक्षाचा शक्तीपात झाल्यावर आणि घाऊक प्रमाणात नेते पक्ष सोडून गेल्यानंतर प्रशांत किशोर यांनीही पंजाबचा रस्ता धरला आहे. त्यामुळे भाजपला आयते कोलीत मिळालेच आहे.

मात्र ममतांनाही यामुळे अंतुर्मख होण्याची वेळ आली आहे. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर विश्‍वास ठेवायला हवा होता की, प्रशांत किशोर यांच्यावर? हा प्रश्‍न मोठा असून प. बंगालचा निकाल काय लागतो यावर याचे उत्तर मिळणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.