नवी दिल्ली – दिल्ली पाठोपाठ पंजाबमध्येही सत्ता काबीज केल्यानंतर आम आदमी पक्षाचा उत्साह वाढला आहे. आप आता गुजरातमध्येही त्यांची सक्रियता वाढवण्यात गुंतला आहे. दरम्यान, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आम आदमी पक्षाबाबत मोठे भाकीत केले आहे. कोणताही पक्ष रातोरात राष्ट्रीय पक्ष बनत नाही, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष व्हायला खूप वेळ लागेल. हा कालावधी किमान 15 ते 20 वर्षांचा असू शकतो, असे प्रशांत किशोर यांनी म्हंटले आहे.
दिग्गज निवडणूक रणनीतीकार म्हणाले की, राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी पक्षाला 20 कोटी मते मिळणे आवश्यक आहे, तर आप ला 2019 मध्ये केवळ 27 लाख मते मिळाली. हे पाहता आम आदमी पक्षाने काहीही बोलणे घाईचे आहे.
आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये क्लीन स्वीप केल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, सैद्धांतिकदृष्ट्या कोणताही पक्ष राष्ट्रीय पक्ष असू शकतो, परंतु इतिहासाची पाने पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की केवळ भाजप आणि काँग्रेस हेच पक्ष देशातील सर्व लोकांपर्यंत पोहोचले आहेत. देशात आतापर्यंत फक्त काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हेच राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास आले आहेत. इतर अनेक पक्षांनी वेळोवेळी प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही, याचा अर्थ असाही नाही की दुसरा कोणताही पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास येऊ शकत नाही, परंतु हे एका रात्रीत होऊ शकत नाही. यासाठी कठोर परिश्रम आणि दीर्घ कालावधी आवश्यक आहे.
नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेबाबत प्रशांत किशोर म्हणाले की, त्यांचे समर्थक सतत त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि कार्यकर्ते त्यांच्यासाठी मेहनत घेत आहेत. लोकप्रिय असण्याचा अर्थ असा नाही की कोणी निवडणूक हरू शकत नाही, बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल हे त्याचे उदाहरण आहे. याशिवाय ताजे उदाहरण म्हणजे अखिलेश यादव आहेत. यूपीमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान अखिलेश यादव यांच्या जाहीर सभांना खूप गर्दी असायची, त्यांना 30 टक्के जास्त मते मिळाली पण निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही.