नवी दिल्ली – निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर हे कॉंग्रेस पक्षात जाणार नाहीत ही बाब आज अधिकृतपणे स्पष्ट झाली आहे. त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेशास नकार दिला आहे अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी ट्विटर संदेशाद्वारे दिली आहे. गेले काही दिवस त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाविषयी चर्चा सुरू होती व त्यावर एक दोन दिवसात निर्णय होणे अपेक्षित होते. पण आता प्रशांत किशोर यांनीच कॉंग्रेसला नकार कळवला आहे.
या संबंधात जारी केलेल्या ट्विटर संदेशात सुर्जेवाला यांनी म्हटले आहे की, प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून जे प्रेझेंटेशन दिले आहे त्यानुसार पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी ग्रुप ऑफ एम्पॉवर्ड 2024 ही समिती स्थापन केली आहे.
त्यात सहभागी होऊन निश्चीत स्वरूपाची जबाबदारी स्वीकारण्याची सूचना सोनिया गांधी यांनी प्रशांत किशोर यांना केली होती. पण त्यांनी ती अमान्य केली. त्यांनी केलेल्या प्रेझेंटशनचे आणि सूचनांचे आम्हाला कौतुक आहे असेही सुर्जेवाला यांनी म्हटले आहे. या अधिकृत स्पष्टीकरणामुळे प्रशांत किशोर नावाचा अध्याय आता कॉंग्रेससाठी संपला आहे असे सांगण्यात येत आहे.
दहा महिन्यांपुर्वीही ते कॉंग्रेसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा होती त्यावेळीही या चर्चेला अचानक ब्रेक लागला होता. त्यानंतरही नव्याने त्यांच्या कॉंग्रस प्रवेशाची जोरात चर्चा सुरू झाली होती. आता त्यालाही अधिकृतपणे ब्रेक लागला आहे.