पाटणा – जेडीयू पक्षाचे अध्यक्ष राजीव रंजन सिंग उर्फ लल्लन यांनी म्हटले आहे की, राजकीय रणनीतीकारातून राजकारणी झालेले प्रशांत किशोर हे भाजपच्या “षडयंत्र” चा एक भाग म्हणून काम करत आहेत. त्यांना आमच्या पक्षाकडून कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रशांत किशोर हे राजकीय कार्यकर्ते नसून ते एक व्यापारी आहेत. मार्केटिंगच्या युक्तिवर त्यांचा सारा खेळ चालतो, असे आरोपही त्यांनी प्रशांत किशोर यांच्यावर केला आहे. त्यांच्या या विधानांमुळे प्रशांत किशोर आणि नितीशकुमार हे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या बातम्या खोट्या ठरल्या असल्याचे मानले जात आहे.
ते म्हणाले की, भाजपला बिहार मध्ये कटकारस्थाने करायची आहेत, त्यांना येथील आमच्या सरकारच्या कामात अडथळे आणायचे आहेत. या कामासाठी त्यांनी याआधी आमच्या पक्षाचे आरसीपी सिंह यांचा वापर केला आणि आता ते यासाठी प्रशांत किशोर यांचा वापर करत आहेत, पण आम्ही सतर्क आहोत, आम्ही हे डाव यशस्वी होऊ देणार नाही, लल्लन म्हणाले.