लक्षवेधी | राजकीय किंगमेकरचा संन्यास

– हेमंत देसाई

आपण निवडणूक व्यवस्थापन व्यवसायातूनच बाहेर पडत आहोत, अशी घोषणाच प्रशांत किशोर यांनी केल्यामुळे, अनेकांना स्वाभाविकपणे धक्‍का बसला आहे. कदाचित बिहारमध्ये एखादा स्वतंत्र पक्ष स्थापण्याचा त्यांचा विचार आहे का, हेही कळायला मार्ग नाही.

नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान होता आले त्या प्रक्रियेत निवडणूक व्यूहरचनाकार म्हणून ज्यांचा हात होता, त्या प्रशांत किशोर यांनी यावेळी तमिळनाडूत द्रमुकला आणि पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका वठवली आहे. खासकरून प. बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर किशोर यांनी टेलिव्हिजनवरील मुलाखतींमधून निवडणूक आयोगावर कोणतीही भिडभाड न ठेवता थेट हल्ला चढवला. प. बंगालमध्ये आश्‍चर्यकारकपणे आठ टप्प्यांत मतदान घेणे, तेथील एकाच जिल्ह्यात मतदानाचे चार टप्पे करणे, याबद्दल त्यांनी तोफ डागली आणि प्रसारमाध्यमेही आयोगाला कोणतेही सवाल कसे करत नाहीत, असा प्रश्‍न केला.

प. बंगालमध्ये आम्हाला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील, हा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला, तेव्हा कोणत्या आधारावर हे बोलत आहात, असा प्रतिप्रश्‍न एकाही पत्रकाराने केला नाही, याबद्दल किशोर यांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले आहे. राजकीय रणनीतीकार हा व्यावसायिक पेशा असूनही, त्यांनी स्पष्ट भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे; परंतु आपण निवडणूक व्यवस्थापन व्यवसायातूनच बाहेर पडत आहोत, अशी घोषणा त्यांनी केल्यामुळे, अनेकांना स्वाभाविकपणे धक्‍का बसला आहे. कदाचित बिहारमध्ये एखादा स्वतंत्र पक्ष स्थापण्याचा त्यांचा विचार आहे का, हे कळायला मार्ग नाही.

2013 साली प्रशांत किशोर यांनी “सिटिझन्स फॉर अकौंटेबल गव्हर्नन्स’ (कॅग) ही माध्यम व प्रचार कंपनी स्थापन केली. मोदींच्या थ्री-डी सभा, रन फॉर युनिटी, चाय पे चर्चा, मंथन आणि समाज माध्यमांवरील कार्यक्रम या सर्व कल्पना किशोर यांच्याच होत्या. त्यानंतर किशोर यांनी मोदींपासून दूर जाणे पसंत केले आणि आपल्या “कॅग’चे रूपांतर “इंडियन पोलिटिकल ऍक्‍शन कमिटी’ (आय-पॅक) मध्ये केले. अमेरिकेतील लॉबिंग करणाऱ्या गटांना “पॅक’ असे संबोधले जाते. त्यावरूनच किशोर यांनी आपल्या कंपनीचे हे नाव ठेवले. 2015 मध्ये या संस्थेने नितीशकुमार यांना बिहार विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून दिला. “नितीश के निश्‍चय : विकास की गॅरंटी’ ही त्यांनी बनवलेली घोषणा खूप गाजली. मुख्यमंत्री होताच नितीशकुमार यांनी किशोर यांना नियोजन आणि प्रकल्प अंमलबजावणी सल्लागार म्हणून नेमले. निवडणूक प्रचारात जो सात कलमी कार्यक्रम त्यांनी जाहीर केला होता, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम किशोर यांच्यावर सोपवण्यात आले होते. मात्र, प्रशांत किशोर यांनी नागरिकत्व कायद्याच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर नितीशकुमार यांनी त्यांना पक्षातून हाकलले.

2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी किशोर यांचाच सल्ला घेतला होता. तेथे कॉंग्रेसला घवघवीत यश मिळाल्यानंतर कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणजित सूरजेवाला यांनी किशोर यांचे जाहीर अभिनंदन केले होते. 2022 मधील विधानसभा निवडणुकीकरिताही पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी किशोर यांचीच सल्लासेवा मागितली आहे. किशोर यांनी हा पेशा सोडला असला, तरी “आय-पॅक’ कंपनीच्या माध्यमातून हे काम चालू राहणारच आहे. 2017च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत किशोर यांचा सल्ला कॉंग्रेसला मात्र कामी आला नाही. कॉंग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या.

कदाचित कॉंग्रेसने त्यांचा सल्ला या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिला असेल. एक शक्‍यता अशी की, कॉंग्रेस पक्षाने अधिकृतरीत्या त्यांचा सल्ला घेतला नसेल. फक्त राहुल गांधींनी मर्यादित प्रमाणात व व्यक्‍तिगतरीत्या हा सल्ला घेतला असू शकतो. मात्र 2017 मध्ये वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना आंध्रमध्ये विधानसभेच्या 175 पैकी 151 जागा मिळाल्या, त्यामागे किशोर यांचा मेंदूच कारणीभूत होता. 2020च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत “आप’ पक्षाला जबरदस्त यश मिळाले. वॉर्डावॉर्डांत जाऊन, लोकांना कोणते प्रश्‍न व कार्यक्रम महत्त्वाचे वाटतात, हे जाणून घेऊन, विभागवार जाहीरनामा तयार करावा, ही किशोर यांची कल्पना मतदारांना अपील झाली.

यावेळी तमिळनाडूत दहा वर्षांनंतर एम. के. स्टॅलिन यांना सत्ता संपादणे शक्‍य झाले आहे. गेल्या वर्ष-दीड वर्षात पॉझिटिव्ह विचार करणारा नेता, अशी स्टॅलिन यांची प्रतिमा निर्माण करण्यात “आय-पॅक’ने महत्त्वाची कामगिरी बजावली. करुणानिधी यांचा पुत्र म्हणून मिळणारी सहानुभूती पुरेशी नव्हती. त्यापलीकडे काही करणे आवश्‍यक होते. त्याबाबतच्या कल्पना किशोर यांनी स्टॅलिन यांना सुचवल्या होत्या.

काही अपवाद वगळल्यास, किशोर यांच्या हाताला यश मिळाले आहे, असा अनुभव आहे. 2019 साली ममतादीदींनी किशोर यांचे सल्लासाह्य मागितले, तेव्हा तृणमूलच्या विरोधात वातावरण होते. लोकसभा निवडणुकीत भाजपने 18 जागा मिळवल्या आणि आणखीन तीन जागा भाजपने केवळ काही मतांनी गमावल्या. दीदी मुसलमानांचे लांगूलचालन करतात आणि त्यांचे सरकार भ्रष्ट आहे, अशी प्रतिमा होती. वास्तविक स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमार्फत काही गैरव्यवहार होत होतेच. राज्यस्तरावरही भ्रष्टाचार प्रकरण घडले होते; परंतु दीदींचा याच्याशी थेट संबंध पोहोचत नाही. उलट भाजपनेच तृणमूलमधील भ्रष्ट नेत्यांना पावन करून घेतले आहे’, हा मेसेज किशोर यांनी मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवला.

मुख्यमंत्र्यांना फोन करून आपली गाऱ्हाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी “दीदी से बोलो’ (दीदींशी बोला) या हॉटलाइनद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. “दुआरे सरकार’ (सरकार तुमच्या दाराशी) या कार्यक्रमांतर्गत पंचायत व पालिका पातळीपर्यंत विविध योजना पोहोचवण्यात आल्या. “आय-पॅक’ची टीम या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवत होती. सरकारकडून अथवा तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील, तर मी त्या दुरुस्त करेन, अशी तयारी दीदींनी लोकांशी थेट बोलताना सतत दाखवली. भाजप हा पक्ष बाहेरच्यांचा आहे आणि तृणमूल हा पक्ष मात्र स्थानिक लोकांचा आहे. दीदी ही बंगालची कन्या आहे, हा मेसेज जनतेच्या मनावर बिंबवण्यात आला.

व्यावसायिक सल्लागारांचा सल्ला घ्या अथवा घेऊ नका; परंतु राजकारणात रणनीती, वेगळ्या कल्पना आणि प्रोफेशनॅलिझम यांची आवश्‍यकता आहे, हे प्रशांत किशोर यांनी दाखवून दिले आहे. याचा अर्थ, उद्या बिहारमध्ये त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून तिसरी आघाडी निर्माण केली, तर त्याला यश मिळेलच असे नव्हे. किंगमेकर किंग होऊ शकेलच असे नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.