नवी दिल्ली – निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचे “आपरेशन कॉंग्रेस’ सुरू झाले आहे. कॉंग्रेसचा अध्यक्ष गांधी कुटुंबाऐवजी बाहेरचा व्यक्ती असावा, असा सल्ला पीके यांनी सोनिया गांधी यांना दिला असल्याची माहिती आहे.
कॉंग्रेसमधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कॉंग्रेसमध्ये चैतन्याचा संचार करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.
सहाशे स्लाईडच्या माध्यमातून त्यांनी कॉंग्रेसला हा सल्ला दिला आहे. गांधी कुटुंबातील सदस्यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी दुसऱ्याला बसवावे आणि स्वत: वेगवेगळ्या भूमिका स्वीकाराव्यात. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी संपुआच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी या पदी कायम रहावे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदीय मंडळाचे अध्यक्षपद सांभाळावे आणि प्रियांका गांधी यांनी कोआर्डिनेशन महासचिव म्हणून काम पाहावे, असा सल्ला पीके यांनी दिला आहे.
यूपीसह पाच राज्यात झालेल्या केविलवाण्या पराभवानंतर प्रशांत किशोर पुन्हा एकदा कॉंग्रेसमध्ये सक्रीय झाले आहेत. गांधी कुटुंबासोबत बैठकांचे सत्र सुरू आहे. कॉंग्रेसला उभारी देण्यासाठी अध्यक्षपद दुसऱ्याकडे असणे आवश्यक आहे.
पीके यांच्यानुसार, कॉंग्रेसने आघाडीचे राजकारण आक्रामकपणे करण्यास सुरवात केली पाहिजे. दक्षिण आणि पूर्व भारतातील 200 जागांवर फोकस करायला पाहिजे. कारण, या जागांवर भाजप कमजोर स्थितीत आहे. कॉंग्रेसने आपली संस्कृती आणि परंपरा जोपासली पाहिजे. यामुळे पक्षाची चांगली प्रतिमा होईल, असेही पीके यांचे म्हणणे आहे.
कॉंग्रेसमध्ये जीवंतपणा आणण्यासाठी विविध मोर्चावर काम करण्याची गरज असल्याचे मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे. प्रामाणिक काय्रकत्र्यांना डावलले जात असल्याच्या खूप तक्रारी आहेत. ही परिस्थिती बदलली पाहिजे. अशा कार्यकत्र्यांना सोबत घेवून त्यांना ताकद द्यावी लागेल आणि पदावरील निष्क्रिय नेत्यांना बाहेरचा मार्ग दाखवावा लागेल. जिल्हा पातळीवर नवीन लीडरशीप आणि संवाद विभाग अद्यावत करावा लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
प्रशांत किशोर यांनी काही घोषणा सुध्दा सुचविल्या आहेत. “हानिकारक मोदी’ आणि “मोदी जानेवाले है’ अशा घोषणा उपयोगात आणाव्या लागतील, असे त्यांचे मत आहे. कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी पंतप्रधानांच्या धोरणांवर हल्ला करण्याचा सल्ला दिला आहे.