हडपसर : “महापौर म्हणून प्रशांत जगताप यांनी केलेले काम मी पाहिलेले आहे. त्यांच्यातील दूरदृष्टीपणा, विकासाचे नियोजन, नागरिकांच्या समस्यांची जाण, सर्वसामान्य माणसाशी असलेला त्यांचा दांडगा संपर्क हडपसरच्या सर्वांगीण विकासासाठी लाभदायी ठरणार आहे. त्यामुळे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रशांत जगताप यांना आमदार म्हणून निवडून देऊया,” असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केले.
हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचाराची सांगता कात्रज ते मांजरी अशी भव्य बाईक रॅली व मांजरी येथील विजयी निर्धार सभेने झाली. सभेवेळी माजी उपमहापौर बंडुतात्या गायकवाड, निलेश मगर, माजी नगरसेवक योगेश ससाणे, वसंत मोरे, दिलीप आबा तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रवीण तुपे, काँगेस कमिटीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप शंकर तुपे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख समीर तुपे, प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे ,गजेंद्र मोरे, शैलेश बेल्हेकर यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले, “मागच्या पाच वर्षात विद्यमान आमदारांनी या भागाचे वाटोळे केले. कोणतेही विकासाचे काम केले नाही. घरी बसून राहणारा, नकाराचा पाढा वाचणारा आमदार नको आहे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदारांना घरी बसवण्याची ही वेळ आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत ‘तुतारी वाजवणारा माणूस’ चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करावे.
या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याची माझी इच्छा आहे. हडपसर, मुंढवा, केशवनगर, मांजरी, कात्रज, कोंढवा या भागाचा सर्वांगीण विकास करण्यावर माझा भर राहणार आहे. पाणीटंचाई, वाहतूक कोंडी दूर करायची आहे.” या वेळी विविध पक्ष-संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने प्रशांत जगताप यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.
सोशल मीडियातून शरद पवारांचे प्रशांत जगताप यांच्या निष्ठेचे कौतुक
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी प्रशांत जगताप यांच्या पक्षनिष्ठेचे कौतुक करीत पाठ थोपटणारे ट्विट केले आहे. तसेच, व्हिडिओच्या माध्यमातून प्रशांत जगताप यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहनही केले आहे.
‘हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीला मतदान करण्यासाठी तुम्हा सर्व सहकाऱ्यांची तयारी झाली असेल. या मतदारसंघात निष्ठेची प्रतिष्ठा ठेवायची असेल, तर महाविकास आघाडीच्या वतीने तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर प्रशांत जगताप यांना आम्ही सर्वांनी उमेदवारी दिली आहे.
पक्षामध्ये राहून जे काम करतात, त्या निष्ठावंतांचा सन्मान होईल. निष्ठा बाजारात विकतात, असा ज्यांचा समज असेल, तर त्यांचा पराभव केल्यानंतर त्यांना योग्य पद्धतीने धडा शिकवल्यासारखे होईल. त्या दृष्टीने या निवडणुकीमध्ये प्रशांत जगताप यांना मोठ्या मतांनी विजयी करा,’ असे आवाहन पवार यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.