हडपसर : माजी महापौर विद्यामन नगरसेवक प्रशांत सुदामराव जगताप यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशांत जगताप यांना आज सर्किट हाऊस येथे निवडीचे पत्र दिले आहे.
हडपसर विधानसभा मतदार संघात अधिक चांगल्या प्रकारे काम करता यावे यासाठी शहाराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी शहराध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा दिला होता. ऑगस्ट 2018 पासून ते शहराध्यक्ष म्हणून काम पहात होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष म्हणून कोणाच्या गळ्यात माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याला अधिक वेळ जाऊ न देता आज. माजी महापौर व नगरसेवक प्रशांत जगताप यांची शहर अध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून खऱ्या अर्थाने राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या प्रशांत जगताप यांनी वाडिया महाविद्यालय येथून उच्च शिक्षण घेतले आहे. राजकारणात पक्षाचे नेते शरद पवार व अजित पवार यांना आदर्श आणि प्रेरणास्थान ठेऊन राजकारणात कार्यरत असलेल्या प्रशांत जगताप यांचे अमिताभ बच्चन व शर्मिला टागोर आवडते आहेत. सन 2000 ला पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिटणीस, पुढे सरचिटणीस, पीएमटी सदस्य, पुन्हा एकदा शहर सरचिटणीस,सन 2012 ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक, पीएमपीएमएलचे संचालक, सन 2016-17 मध्ये पुण्याचे महापौर अशी जबाबदारी सांभाळलेल्या नगरसेवक प्रशांत जगताप यांना आता पक्षाने शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर संघटनेत 19 तर महापालिकेत 21 वर्षाचा अनुभव राहिलेल्या प्रशांत जगताप यांच्यावर पालकमंत्री अजित पवार यांनी शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला सक्षम आणि सक्रीय शहराध्यक्ष निवडावा लागणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. तसेच सध्याची कोविड परिस्थितीत काम करणारा आणि आगामी निवडणुका जिंकून देणारा सक्रीय नेता पक्षाला शहराच्या अध्यक्षपदी नेमावा लागणार होता अशी राजकीय अटकळ बांधली जात होती. आज प्रशांत जगताप यांच्या निवडीने त्याला पूर्ण विराम मिळाला आहे.
पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडणार
मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारातूनच मी आजवर सामाजिक आणि राजकीय कार्य करत आलो आहे.आज पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडणार असून पक्ष संघटन वाढवण्याबरोबरच आताच्या कोरोना महामारीत पक्षाच्या माध्यमातून नागरिकांना आधिकाधिका मदत करता येईल,याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
प्रशांत जगताप (शहर अध्यक्ष- पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांना पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी आमदार चेतन तुपे पाटील,आमदार सुनील टिंगरे, सभागृह नेते नगरसेवक सुभाष जगताप, बाबुराव चांदेरे, दत्तात्रय धनकवडे, विशाल तांबे, नगरसेविका नंदा लोणकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.