वेरुळ : महायुतीचे गंगापूर- खूलताबाद मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत बंब यांनी मतदारांना धमकी दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात प्रशांत बंब माझ्या मित्राला आदेश दिला तर पळता भुई थोडी होईल, खाली बैस जास्त आवाज करू नको असे म्हणताना दिसत आहे.
दरम्यान गंगापूर- खूलताबाद मतदारसंघात महायुतीचे प्रशांत बंब आणि मविआचे सतीश चव्हाण निवडणूक लढवत आहेत.
प्रशांत बंब यांना वेरूळ येथील ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी प्रचार सभा सुरू होताच वेरूळ ग्रामस्थांनी पंधरा वर्षे काय केले आधी ते सांगा मग मत मागा अशी भूमिका घेत सभा काही काळ थांबवली.
सामाजिक कार्यकर्ते सतीश लोखंडे यांनी शेतकऱ्यांसाठीचे प्रश्न, पशुवैद्यकीय दवाखाना, मक्का संशोधन केंद्र, भोसले चौक ते माटेगाव चौफुली रस्ता, पर्यटन अभ्यागत केंद्र, तरुणांसाठी रोजगाराचे प्रश्न यावर प्रश्न उपस्थित करत यावर आपली भूमिका काय आहे हे विचारताच आमदार प्रशांत बंब यांनी जास्त बोलू नको तुला पळता भुई थोडी होईल अशी धमकी दिली.
तसेच माजी जीप सदस्य भिमराव खंडागळे व त्यांचे कार्यकर्ते यांनी देखील धमकी देत दमदाटी केली. यामुळे वेरूळ ग्रामस्थ आणि प्रशांत बंब यांच्या कार्यकर्त्यात बाचाबाची झाली.