पुणे -शहरात विविध ठिकाणी गणेशोत्सव मंडळांकडून लावण्यात येणाऱ्या स्वागत कमानी आणि रनिंग मंडपाचे महापालिकेकडून आकारले जाणारे शुल्क माफ करण्यात आले आहे. स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. त्यासंबंधी नगरसेवक हेमंत रासने यांनी दिलेला ठराव मंजूर करण्यात आला.
ठरावाला सूचक नगरसेवक हेमंत रासने आणि अनुमोदन नगरसेवक दीपक पोटे यांनी दिले होते. यासंबंधी रासने यांनीही यापूर्वी अनेकदा मागणी केली होती. मंगळवारी झालेल्या बैठकीत हा ठराव दाखल करण्यात आला होता. त्यावर बुधवारी चर्चा करून ठराव स्थायी समितीत मान्य करण्यात आला. त्यामुळे प्रशासनाने त्वरीत याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी रासने यांनी केली आहे.
गणेशोत्सव नागरिक स्वयंस्फूर्तीने आणि समर्पित भावनेने साजरा करतात. उत्सवात मंडळांच्या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे कमानी आणि रनिंग मंडपांसाठीचे शुल्क माफ करावे, अशी मागणी मी यापूर्वी केली होती. त्याला यश आले असून, स्थायी समितीमध्ये हा ठराव मंजूर झाला आहे. मुख्यसभाही त्याला मान्यता देईल, त्यामुळे यंदा प्रशासनाने याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी रासने यांनी केली आहे.