Hardik Pandya । Prasad Khandekar । Victory Parade । Team India : टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशात परतली आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर टीम इंडिया मुंबईत दाखल झाली. मुंबईत टीम इंडियाची भव्य व्हिक्ट्री परेड निघाली.
यादरम्यान संघाचे सदस्य ट्राफीसह खुल्या बसमध्ये बसून विजयी मिरवणुकीत सहभागी झाले होते. यानंतर बीसीसीआयने वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंचा सत्कार करून 125 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
सत्कार समारंभ आटोपल्यानंतर खेळाडूंनी वानखेडे स्टेडियमच्या मैदानावर गोल फिरत चाहत्यांचे आभार मानले आणि प्रेक्षकांना सही केलेले चेंडू दिले.
दरम्यान, नरिमन पॉइंट ते मरिन ड्राइव्हपर्यंत भारतीय संघाची बसमधून मिरवणूक काढण्यात आली यावेळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरने यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. ‘..आणि हार्दिकने माझ्याकडे बघून वर्ल्ड कप उंचावला’, असं प्रसादने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
सध्या त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अभिनेत्याला काही प्रमाणात ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागत आहे. मात्र, आता ट्रोलिंगनंतर प्रसादने उत्तरसुद्धा दिलं आहे.
प्रसाद खांडेकरांची पोस्ट एकदा पाहाच….
‘…आणि हार्दिकने माझ्याकडे बघून वर्ल्ड कप उंचावला. आज साऊथ मुंबईला कामानिमित्त जायचंच होतं. विचार केला की नरिमन पॉईंटला जाऊन चॅम्पियन्सच्या विजयी मिरवणुकीत पण सहभागी होऊया. पण न्यूजमध्ये गर्दीचे फोटो पाहिले आणि जायचा मोह टाळला. गप्पपणे बोरिवलीला निघालो.
साधारण सांताक्रूझच्या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमत असलेली दिसली आणि पटकन ट्यूब पेटली की अरे आपले चॅम्पियन्स इथूनच जाणार आहेत. नंतर थोड्या वेळात आजूबाजूला पाहिलं तर संपूर्ण हायवेवर गाड्या रस्त्यात मध्येच आडव्या टाकून सगळेच टीम इंडियाची वाट बघत होते.
क्षणाचाही विलंब न करता गाडीतून उतरलो आणि दुसऱ्या क्षणाला जगजेत्ते गाडीतून समोर आले. अगदी आतून मनातल्या मनात त्यांना एक सॅल्युट ठोकला. कदाचित तो मनातल्या मनात अगदी मनापासून ठोकलेला सॅल्युट टेलिपथीने हार्दिक पांड्यापर्यंत पोहोचला असावा. त्यानेसुद्धा पुढील क्षणाला बसमधून माझ्याकडे बघून वर्ल्ड कपचा कप उंचावला,’
View this post on Instagram
‘आयपीएल दरम्यान ज्या मुंबईने हार्दिकला ट्रोल केलं. आज त्याच मुंबईकरांचं स्वागत खुल्या दिलाने स्वीकारायला हार्दिक अगदी ड्राइव्हरच्या बाजूला बसलेला. त्याच्या पाठोपाठ अर्ध्या अर्ध्या सेकंदसाठी दर्शन झालं ते द वॉल राहुल द्रविड, गरजेच्या क्षणी उभा राहणारा बुम बुम बुमराह, दुखापतीवर मात करून दमदार पुनरागमन करणारा ऋषभ पंत आणि सगळेच,
आमचा बोरिवलीकर रोहित, विराट, सूर्या सगळ्यांनाच सॅल्युट ठोकायचा होता. गर्दी जमणे आणि जमवणे यातील फरक पाहिला. स्वागतासाठी अशी गर्दी स्वतःहून जमली पाहिजे. टीम इंडिया चॅम्पियन्स तुम्हाला प्रचंड प्रेम आणि अभिमान मित्रांनो भावांनो,’ अशा शब्दांत प्रसादने भावना व्यक्त केल्या.