गावसकर यांच्यावर प्रसाद यांचे टीकास्त्र

नवी दिल्ली – क्रिकेटमध्ये चार पावसाळे काढले म्हणजे टीका करण्याचे सर्वाधिकार मिळाले असे कोणी समजू नये. जरी राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्यांनी जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले नसले तरी या सदस्यांना खेळाचा सखोल अभ्यास आहे. त्यामुळेच ही समिती खेळाडूंची निवड करण्याबाबत समर्थ आहे अशा शब्दात या समितीचे अध्यक्ष एम.एस.के.प्रसाद यांनी ज्येष्ठ क्रिकेटपटू व समालोचक सुनील गावसकर यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

प्रसाद यांना कसोटी सामन्यांचा कमी अनुभव आहे. तसेच अन्य सदस्यांनीही आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसे सामने खेळलेले नाहीत. निवड समिती ही संघ व्यवस्थापनाच्या हातातील बाहुले आहे, त्यांच्याकडे दूरदृष्टीचा अभाव आहे अशी टीका गावसकर यांनी केली होती. या टीकेस उत्तर देताना प्रसाद म्हणाले की, समितीमधील सदस्यांनी विविध स्वरूपाच्या अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. आम्ही सर्व सदस्यांनी मिळून प्रथम दर्जाचे 477 सामने खेळले आहेत. आम्ही सदस्य म्हणून काम करताना वेगवेगळ्या स्वरूपाचे दोनशेहून अधिक प्रथम दर्जाचे सामने खेळले आहेत. नेपुण्य शोध घेण्यासाठी एवढा अनुभव पुरेसा आहे.

समितीच्या सदस्यांनी मिळून तेरापेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेले नाहीत अशी या समितीबाबत टीका केली जाते. यासंबधी प्रसाद म्हणाले की, इंग्लंडच्या राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एडी स्मिथ यांनी एकच कसोटी सामना खेळला आहे. तरीही त्यांनी निवडलेल्या संघाने यंदा विश्‍वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष ट्रेव्हर हॉन्स यांनी फक्त सातच कसोटी सामने खेळले आहेत तरीही त्यांच्या नेतृत्वाखालील संघात स्टीव्ह वॉ यांचा समावेश होता. वॉ यांनी 128 कसोटी व 244 एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. हॉन्स यांच्या निवड समितीमध्ये ग्रेग चॅपेल काम करीत आहेत. ट्रेव्हर यांच्यापेक्षा त्यांनी जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

प्रसाद यांनी पुढे सांगितले की, जर आंतरराष्ट्रीय सामन्यांचा निकष लावला गेला असता तर कै. राजसिंग डुंगारपूर यांना निवड समितीचे अध्यक्ष म्हणून कामच करता आले नसते. त्यांनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. प्रत्येक ज्येष्ठ्‌ खेळाडूंबाबत मला खूप आदर आहे. मात्र ज्याप्रकारे आमच्या समितीवर टीका झाली आहे, ती टीका त्यांच्यासारख्या खेळाडूंकडून अपेक्षित नाही.

निवड समितीमधील सदस्यांमध्ये मतभेद असू शकतात. प्रत्येक माणसाची विचार करण्याची बुद्धी वेगवेगळी असू शकते मात्र आम्ही सदस्य म्हणून काम करताना आमच्यातील मतभेद चार भिंतीत ठेवत असतो. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली व भारत “अ’ संघास मार्गदर्शन करणारे राहुल द्रविड यांची मते वेगवेगळी असतात. मात्र आम्ही शेवटी एक संघ म्हणूनच समितीचे कार्य करीत असतो असेही प्रसाद यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)